December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी क्षेत्रात एकल वापर प्लास्टिकवर बंदी

प्लास्टिक बंदीची कारवाई काटेकोरपणे करण्याचे आयुक्तांचे निर्देश

कल्याण

केंद्रशासन व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार महापालिका क्षेत्रात एकल वापराच्या प्लास्टिकवरील बंदीबाबत महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

१ जूलैपासून संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्र राज्यात एकल वापर प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून त्याअनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने आज अत्रे रंगमंदीर येथील कॉन्फरन्स हाल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या या पर्यावरणास हानीकारक ठरतात, त्यामुळे पर्यावरणास घातक ठरणा-या एकल वापर प्लास्टिक पिशव्यांवर महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक व थर्माकोल बंदी अधिनियम २०१८ अन्वये बंदी घातली असून महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, घनकचरा विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी महापालिका क्षेत्रात प्लास्टिक वस्तुंवर बंदीबाबत माहिती दिली.

केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ पासून अधिसूचित केलेल्या सुधारीत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०२१ नुसार सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल) मिठाईचे बॉक्स, आंमत्रण कार्ड व सिगारेटची पाकीटे यांची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिकच्या कांडयांसह कानकोरणे, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांडया, प्लास्टिकचे झेंडे,कँडी कांडया, आईस्क्रिम कांडया/प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रा, ट्रे, ढवळण्या (स्टिरर्स), १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी, कंम्पोस्टेबल प्लास्टिक (कचरा व नर्सरी साठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या ( कॅरी बॅग्स, नॉन ओव्हन बॅग्ससह – पॉलिप्रोपिलीन पासून बनविलेले), हॅण्डल असलेल्या व नसलेल्या डिश, बाउल, कॅन्टेनर (डब्बे) (हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगकरीता) इत्यादी एकल वापर प्लास्टिक वस्तुंवर बंदी केली आहे.

तसेच, प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचने अंतर्गत दंड दुकानदार, फळे व भाजी विक्रेते, व्यापा-यांकरीता प्रथम गुन्हा केल्यास ५ हजार रुपये, दुसरा गुन्हा केल्यास १० हजार रुपये, तिसरा गुन्हा केल्यास २५ हजार रुपये व ३ महिन्याचा कारावास अशी दंडांची आकारणी केली जाणार आहे.

या बैठकीस महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण विभागाचे विभागीय अधिकारी कुकडे, उपविभागीय अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, महापालिकचे उपआयुक्त अर्चना दिवे, पल्लवी भागवत, धैर्यशिल जाधव, वंदना गुळवे, महापालिका सचिव संजय जाधव व सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरिक्षक, व्यापारी वर्ग, एनजीओचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्लास्टिक बंदीबाबतची शपथ सर्वांनी घेतली.