December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

मोफत धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन

उल्हासनगर

‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको’ या निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या उद्घोषातून प्रेरणा घेत संत निरंकारी सत्संग भवन, गोल मैदान, उल्हासनगर येथे संत निरंकारी मिशनच्या विद्यमाने रविवारी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये उल्हासनगर व आसपासच्या परिसरातील १२१ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले, मुंबई यांनी ६१ युनिट तर रेड क्रॉस रक्तपेढी यांनी ६० युनिट रक्त संकलित केले.

मंडळाच्या डोंबिवली क्षेत्राचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उल्हासनगर विभागाचे सेक्टर संयोजक किशन नेनवानी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादल स्वयंसेवकांनी व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

मोफत धर्मार्थ दवाखाना

संत निरंकारी मिशनचा समाज कल्याण विभाग आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रविवारी संत निरंकारी सत्संग भवन, सूर्या शाळेजवळ, विठ्ठलवाडी येथे मोफत धर्मार्थ दवाखाना सुरु करण्यात आला असून त्याचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्राचे क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उल्हासनगर सेक्टर संयोजक किशन नेनवानी तसेच स्थानिक ब्रांच मुखी अविनाश माने यांच्यासह दवाखान्यामध्ये आपल्या सेवा उपलब्ध करुन देणारा डॉक्टरवर्ग उपस्थित होता.

हा मोफत दवाखाना दर रविवारी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळात चालविण्यात येणार असून त्याचा लाभ आजुबाजुच्या परिसरातील सर्वसामान्य गरजू नागरीक तसेच संत निरंकारी मिशनच्या अनुयायांना होणार आहे. या दवाखान्यामध्ये ॲलोपॅथी तसेच होमिओपॅथीचे उपचार गरजू रुग्णांना विनामूल्य उपलब्ध करुन दिले जातील. उद्घाटनाच्या दिवशीच याठिकाणी अनेक गरजू रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला.

मिशनमार्फत देशभरात १०० पेक्षा अधिक धर्मार्थ दवाखाने चालविण्यात येत आहेत. या व्यतिरिक्त दिल्ली, आगरा, कोलकाता आणि चेन्नई या शहरांमध्ये धर्मार्थ हॉस्पिटल मिशनमार्फत मागील अनेक वर्षांपासून चालविले जात आहेत.