December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

कल्याण

‘आपले जीवन परोपकारासाठी वेचल्यानेच त्याचे मोल वाढते’ या निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणूकीला अनुसरुन ठाकुर्ली येथे ७३ तर कोपरखैरणे, नवी मुंबई येथे १८७ निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने ज्ञानविकास शैक्षणिक संस्थेच्या कोपरखैरणे येथील शैक्षणिक संकुलामध्ये तसेच संत निरंकारी सत्संग भवन, गोळवली, ठाकुर्ली (पूर्व) येथे रविवारी रक्तदान शिबिरांचे करण्यात आले होते.

ठाकुर्ली येथील शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली झोनचे प्रभारी रावसाहेब हसबे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाच्या आजुबाजुच्या शाखांचे मुखी तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते. या शिबिरामध्ये जे.जे.महानगर रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले. मंडळाच्या ठाकुर्ली ब्रँचचे मुखी कृष्णकांत कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कोपरखैरणे येथील शिबिराचे उद्घाटन ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष ॲङ. पी. सी. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संत निरंकारी मिशनचे सेक्टर संयोजक, स्थानिक प्रबंधक व सेवादल अधिकाऱ्यांव्यतिरिक्त ज्ञानविकास संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलन केले.

द्वारलीपाडा-कल्याण येथे शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर

दहावी व बारावी नंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार पुढील अभ्यासक्रम तसेच विविध क्षेत्रांमधील करिअरच्या संधी याविषयी योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते ही बाब विचारात घेऊन संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, द्वारलीपाडा, कल्याण (पूर्व) येथे रविवारी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १० वी ते पदवी पर्यंतच्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तज्ञ मार्गदर्शकांनी आपल्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, लागणारी फी, विद्यार्थ्यांना उपलब्ध होणारे शैक्षणिक कर्ज याबद्दल देखील माहिती देण्यात आली.

शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर

शिबिरामध्ये शुभम शिंदे यांनी आर्ट्स, संतोष प्रजापती यांनी कॉमर्स, विरेन लीलाकर यांनी सायन्स आणि मेडिकल, गौरव गावडे यांनी अभियांत्रिकी, विवेक गोसावी यांनी स्पर्धा परीक्षा, अशोक प्रधान यांनी डिफेन्स, सारंग गायकवाड यांनी अॅनिमेशन आदी विषयांवर मार्गदर्शन केले. तर या शिबिराचे सूत्र संचलन रुपेश सावंत यांनी केले.

या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाच्या कल्याण सेक्टरचे संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले. शिबिरामध्ये उपस्थित मान्यवरांमध्ये माजी सरपंच तथा शिवसेना विभाग प्रमुख चैनु जाधव, राष्ट्रवादी शिक्षक सेल कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष प्रवीण खाडे, मराळेश्वर विद्यालय म्हारळचे शिक्षक हरिश्चंद्र राणे आदि उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी द्वारलीपाडा ब्रांच मुखी दशरथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रबंधक व स्थानिक सेवादल युनिटने महत्वपूर्ण भूमिका निभावली.