December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्व साधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम आज सकाळी आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण पश्चिम येथे महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, निवडणूक विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून दयावयाच्या पालिका सदस्यांची संख्या १३३ इतकी आहे.

यापूर्वी दिनांक ३१ मे रोजी घेण्यात आलेल्या सोडतीच्या पहिल्या टप्प्यात अनुसूचित जातीच्या १३ जागांपैकी अनुसूचित जातीच्या महिलांच्या ७ जागांसाठी सोडत काढण्यात आली होती त्याप्रमाणे अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या ४ जागांपैकी अनुसूचित जमातीच्या महिलांच्या २ जागांसाठी सोडत काढण्यात आली होती. आता समर्पित आयोगाच्या अहवालाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्णयानुसार आज नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गा करिता ३५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १८ जागा या नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत आणि चाळीस जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनानुसार मतदार यादी अंतिम झालेली आहे. तथापि अजूनही ज्या मतदारांची नावे ते राहत असलेल्या प्रभागामध्ये नसतील तर त्यांनी फॉर्म नं ८ भरुन आपल्या प्रभागात दयावा त्याची तपासणी होऊन मतदार नोंदणी अधिकारी त्यावर निर्णय घेणार आहेत. ज्या मतदारांची नावे वगळली गेली आहेत त्यांनी फॉर्म नं ६ भरुन आपल्या प्रभागात दिल्यानंतर त्यांचीही नावे मतदार यादीत समाविष्ट होतील अशीही माहिती पालिका आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी दिली. या सोडत कार्यक्रमाचे सुत्र संचालन महापालिका सचिव संजय जाधव यांनी केले.