October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

Kalyan: गणेशोत्सवासाठी मंडळाना मंडप शुल्क माफ

महापालिका आयुक्त डॉ. दांगडे यांचा निर्णय

कल्याण

यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाले असले तरीही सर्व खबरदारी घेऊनच गणेशोत्सवाचे आयोजन करावे, यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळाना मंडप शुल्क माफ राहील आणि फायर शुल्कावर ५० टक्के सूट देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतला आहे. गणेशोत्सवासंदर्भात महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

या बैठकीस पोलिस उपआयुक्त सचिन गुंजाळ, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली, महापालिका सचिव, महापालिकेचे उपायुक्त, कल्याणचे सहा. पोलिस आयुक्त, वाहतूकीचे सहा. पोलिस आयुक्त, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिकेचे सहा.आयुक्त, बाजारपेठ, महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, खडकपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक, सार्वजनिक गणेशोत्सव मेळा संघाचे विश्वस्त, अखिल सार्व. गणेशोत्सव महासंघाचे पदाधिकारी हे प्रत्यक्ष व ८३ सार्व. गणेशोत्सव मंडळे दुरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव सर्वत्र साजरा केला जावा तसेच गणेशोत्सवापूर्वी पावसाने उघडीप दिल्यावर रस्त्यावरील खड्डे महापालिकेतर्फे बुजविले जातील. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.दांगडे यांनी यावेळी केले. गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात एक खिडकी योजना राबिवली जाईल त्याप्रमाणे या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी ऑन कॉल विसर्जन आणि विसर्जन आपल्या दारी या संकल्पना महापालिकेमार्फत राबिवल्या जातील. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी गणेश विसर्जनाकरिता नागरिकांच्या सोयीसाठी ६७ जनरेटर, २४५५ हॅलोजन, ८८ टॉवर, १६८ सीसी टिव्ही कॅमेरे यांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली.

यंदा पोलिस परवानगी साठी कोणालाही व्यक्तीश: पोलिस स्टेशनला येऊन परवानगी घ्यावी लागणार नाही. सिटीजन पोर्टल या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन परवानगी देण्यात येणार आहे. गणेश मुर्तीची पूर्ण जबाबदारी मंडळाची राहील. पोलिसांचे पथक वेळोवेळी मंडळांची पाहणी करतील असे परिमंडळ -३ चे उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले.