April 19, 2025

news on web

the news on web in leading news website

जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याणात भव्य रॅली

संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याणचे आयोजन

कल्याण

आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या अस्तित्वाची ओळख जगाला व्हावी आणि एकजुटीचे प्रदर्शन व्हावे यासाठी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्त साधून कल्याणमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे पेहराव परिधान करून नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या रॅलीत सुशिक्षित तरुणाईचा मोठ्या प्रमणात सहभाग असल्याचे दिसून आले.

कल्याणमध्ये भव्य रॅली

पश्चिमेतील सुभाष मैदान येथून सुरू झालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, पत्रीपूल, चक्की नाका, विजयनगर येथे समारोप झाला. रॅलीमध्ये आदिवासींची संस्कृती, आदिवासी नृत्य, आदिवासी गीते, पोवाडे, विविध वाद्य, वेशभूषा, पारंपारिक लोकनृत्याच्या माध्यमातून आदिवासी कलागुण पाहायला मिळाले. तसेच आदिवासी क्रांतिकारकांचे देखावे सादर करण्यात आले. या रॅलीत संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याणचे अध्यक्ष प्रभुदास पंधरे, सचिव सुरेश पवार, कोशाध्यक्ष शांताराम बांबळे, नगरसेविका शीतल मंढारी, सहाय्यक आयुक्त सविता हिले, पालिका अधिकारी भागाजी भांगरे यांच्यासह हजारोंच्या संख्येने सर्व आदिवासी बांधव सहभागी झाले.

९ ऑगस्ट हा दिवस युनोने जागतिक आदिवासी दिवस जाहीर केला असून त्यानुसार हा जागतिक आदिवासी दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. भारताच्या राष्ट्रपतीपदी नुकत्याच विराजमान झालेल्या द्रोपदी मुर्मू या देखील आदिवासी असून भारताच्या लोकसंख्येपैकी ८ टक्के नागरिक आदिवासी आहेत. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी शासनाने सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी राष्ट्रपतींना पत्र पाठवले असल्याची माहिती संयुक्त आदिवासी उत्सव समिती कल्याणचे अध्यक्ष प्रभुदास पंधरे यांनी दिली.