The Web Cloud Media

the news on web in leading news website in maharashtra

“घरोघरी तिरंगा” उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन

भारतीय सांस्कृतिक पोशाखात विद्यार्थी होणार सहभागी

कल्याण

“घरोघरी तिरंगा” उपक्रमाच्या जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले असून या प्रभात फेरीत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, स्काऊटगाईड विद्यार्थी भारतीय सांस्कृतिक पोशाखात सहभागी होणार आहेत.

पालक, बालक आणि बालकांचे शिक्षक यांचे राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असते, त्यामुळे आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने देखील कंबर कसली असून महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांचे मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये तसेच महापालिका परिक्षेत्रातील इतर शाळांमध्ये देखील “घरोघरी तिरंगा” या उपक्रमासाठी दिनांक 1 ऑगस्ट पासून शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या घेण्यात येत आहेत.

त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने हा उपक्रम घरोघरी पोहोचविण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रत्येक शाळेत पालक सभा ही आयोजित करण्यात येत आहे. आता “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी कल्याण व डोंबिवली विभागांतर्गत शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांच्या भारतीय सांस्कृतिक पोशाखातील प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

कल्याण मध्ये या प्रभात फेरीचा प्रारंभ 12 ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता बिर्ला महाविद्यालयातून होणार असून बिर्ला महाविद्यालय-बिर्ला स्कूल- आरटीओ कार्यालय- वाणी विद्यालय-साई चौक- राधानगर- वायले नगर- त्रिवेणी गार्डन- शासकीय गोडाऊन आधारवाडी चौक-लालचौकी- पारनाका-गांधी चौक-सुभाष मैदान येथे पोहोचून सामूहिक राष्ट्रगीता नंतर या प्रभाग फेरीची सांगता होईल. तर डोंबिवली मध्ये सकाळी 8 वाजता सावळाराम क्रीडा संकुल घरडा सर्कल येथून प्रभात फेरीचा प्रारंभ होणार असून सावळाराम क्रीडा संकुल-घरडा सर्कल-शेलार नाका- पाथर्ली शाळेकडून, गोग्रासवाडी रोड- गोपाळ नगर मार्ग-टायटन शोरूम जवळून- टिळक पुतळा चौक मार्गे फत्ते अली शाळा येथे पोहचून सामूहिक राष्ट्रगीतानंतर या प्रभात फेरीची सांगता होईल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *