कल्याण
संत निरंकारी मिशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी मिशनने सुरु केलेल्या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह परियोजने अंतर्गत कल्याणमध्ये बारावे कचरा वर्गीकरण प्रकल्प येथे शुक्रवारी १७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये जांभुळ, सिसम, वेळा, आवळा, वावळ आदि जातीच्या झाडांचा समावेश आहे. येत्या तीन वर्षांपर्यंत किंवा ही झाडे आत्मनिर्भर होईपर्यंत संत निरंकारी मिशनचे सेवादार त्यांचे संगोपन व संरक्षण करणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित वर्तमान निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली ऑगस्ट, २०२१ पासून ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह योजना देशभर सुरु करण्यात आली असून त्या अंतर्गत देशभरातील ३५० हून अधिक ठिकाणी या योजने अंतर्गत १,५०,००० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी जेव्हा या योजनेचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी कल्याण मध्ये उंबर्डे येथे महापालिकेच्या भूखंडावर या वननेस वन परियोजने अंतर्गत ९०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्याचे संगोपन निरंकारी मिशनच्या भक्तगणांकडून उत्तमप्रकारे केले जात आहे.
या व्यतिरिक्त या महाअभियाना अंतर्गत मुंबई शहरात मागील वर्षी तीन ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे यार्डच्या १५२० चौरस फूट जागेवर ५०० रोपे लावण्यात आली आहेत. अन्य ठिकाणांमध्ये मरोळ पोलीस परेड मैदान, अंधेरी आणि गांवदेवी मैदान, घाटला व्हीलेज, चेंबूर यांचा समावेश होता. याशिवाय नवी मुंबईत कोपरखैरणे येथील पावणे ब्रिजजवळ ठाणे-बेलापूर हायवेलगत नवी मुंबई महापालिकेच्या जागेत या अभियाना अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. या सर्व ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांची निगा राखण्याची कार्य निरंकारी मिशनचे सेवादार सातत्याने करत आहेत.
कल्याण येथील या ‘वननेस वन’ नागरी वृक्ष समूह उपक्रमाचे उद्घाटन करताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे म्हणाले, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षाचा सांगता समारोह साजरा होत असताना त्याचाच एक भाग म्हणून संत निरंकारी मिशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाणारे हे वृक्षारोपण अभियान यापुढेही जागेच्या उपलब्धतेनुसार जारी ठेवण्यात येईल. निरंकारी मिशनमार्फत देशभर राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी मन:पूर्वक कौतुक केले.
या प्रसंगी महापालिका सचिव संजय जाधव, उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता अनंत मादगुंडी आदि पालिका अधिकारी उपस्थित होते. या व्यतिरिक्त संत निरंकारी मंडळाचे कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे, द्वारली पाडा ब्रांचमुखी दशरथ म्हात्रे यांच्यासह सेवादल अधिकारी, सेवादल सदस्य आणि भक्तगण उपस्थित होते. मंडळाच्या डोंबिवली झोनचे प्रभारी रावसाहेब हसबे आणि कल्याणचे सेक्टर संयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सेवादल स्वयंसेवकांनी हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.
वृक्षांपासून प्राणवायूची निर्मिती होते आणि आज ती काळाची गरज बनलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी वननेस वन योजना राबवून नागरी वृक्ष समूह निर्मिती करण्याची प्रेरणा निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी भक्तगणांना दिली आहे.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर