ठाणे
संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, कळवा येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये कळवा परिसरातील २०६ निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले, मुंबई यांनी ११९ युनिट तर सिव्हील हॉस्पिटल, ठाणे यांनी ८७ युनिट रक्त संकलित केले.
आपले उत्तम मानवी जीवन परोपकारामध्ये लावावे या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या संदेशाला मूर्त रूप देत एकंदर ३२५ रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये भाग घेतला ज्यापैकी २०६ निरंकारी भक्तांना रक्तदान करण्याची संधी मिळाली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले.
शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी नगरसेविका प्रियंका पाटील, प्रमिला केणी, अपर्णा साळवी, माजी विरोधी पक्षनेता मिलींद पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी तसेच विभागप्रमुख अविनाश पाटील आणि राष्ट्रवादी युवा नेता मंदार केणी आदिंचा समावेश होता. संत निरंकारी मंडळाचे अनेक सेक्टर संयोजक तसेच सेवादल अधिकारीही या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते.
मंडळाचे स्थानिक मुखी कांतिराम सेमवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने हे शिबिर यशस्वीपणे राबविण्यात आले.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण
केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा : आमदार भोईर