December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC : विशेष स्वच्छता मोहिमेला आयुक्तांच्या हस्ते सुरुवात

कल्याण

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेत महापालिका कर्मचा-यांबरोबरच नागरिक, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था यांनी देखील सहभागी होऊन कल्याण डोंबिवली परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत महापालिका क्षेत्रात श्री गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणा-या विशेष स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना त्यांनी हे आवाहन केले.

या विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा परिसर तसेच गणेश विसर्जन स्थळे, श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग यांची विशेष स्वच्छता करुन घेणेबाबत घनकचरा विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील यांनी सर्व प्रभागातील स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांना आदेशित केले आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व प्रभागाच्या सहा. आयुक्तांना देखील प्रभागातील सफाई कर्मचा-यांमार्फत विशेष स्वच्छता मोहिम कटाक्षाने राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

नागरीकांनी देखील या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपल्या घरामध्ये निर्माण होणारा दैनंदिन ओला व सुका कचरा वेगळा करुन महापालिकेच्या घंटा गाडीकडे दयावा जेणेकरुन सदर कच-याची पुढील प्रोसेस सुलभ होईल, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी केले.

यावेळी घनकचरा विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, परिमंडळ 1 चे उपआयुक्त धैर्यशील जाधव, उपआयुक्त (सा.प्र) अर्चना दिवे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, क प्रभागाचे सहा. आयुक्त सुधीर मोकल, ब प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर ठाकूर, ड प्रभाग सहा. आयुक्त सविता हिले, महापालिकेचे स्वच्छता अधिकारी, उप स्वच्छता अधिकारी, आरोग्य निरिक्षक, सफाई कर्मचारी वर्ग उपस्थित होता.