December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC ने केली ऑन कॉल गणेश विसर्जन व्यवस्था

पालिका आयुक्त, पोलीस उपायुक्तांनी केली गणेश घाटाची संयुक्त पाहणी

कल्याण

यंदाच्या गणेशोत्सव विसर्जनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने जय्यत तयारी केली असून महापालिका परिसरातील प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या किल्ले दुर्गाडी येथील गणेश घाटाची महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, परिमंडळ 3 चे पोलिस उपआयुक्त सचिन गुंजाळ, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी आज पाहणी केली. त्याचप्रमाणे महापालिकेने ऑन कॉल विसर्जनाची व्यवस्था देखील केलेली आहे.

दुगार्डी गणेश घाटावर कल्याण परिसरातील, कोन गावातील तसेच उल्हासनगर मधीलही मोठया गणेश मुर्ती विसर्जनासाठी आणल्या जातात. या ठिकाणची वाहतूक सुरळीत रहावी व विसर्जन प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी या दृष्टीकोनातून व्यवस्था करण्यात आलेली आहे. घरगुती गणपती साठी कृत्रिम तलावाची व्यवस्था महापालिकेने विविध प्रभागात केलेली आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने ऑन कॉल विसर्जनाची व्यवस्था देखील केलेली आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था केलेली असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली.

दुर्गा माता चौक ते दुगार्डी गणेश घाट परिसरात महापालिकेच्या विदयुत विभागामार्फत 125 केव्हीएचे 3 जनरेटर, 1000 वॅटचे 120 हॅलोजन, 12 सी.सी.टी.व्ही कॅमेरे, उद्घोषणा करण्यासाठी 2 साऊंड सिस्टिम आणि प्रत्येकी 20 हॅलोजनच्या 10 लाईटिंग टॉवरची व्यवस्था करण्यात आली असून बांधकाम विभागामार्फत गणेश मुर्ती नेण्यासाठी व परत जाण्यासाठी स्वतंत्र ॲप्रोच रोड, मंडप, खुर्च्या, टेबल्स तसेच पिण्याच्या पाण्यासाठी टाकीची व्यवस्था महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली आहे.

यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, प्रशांत भागवत, परिमंडळ 1 चे उपआयुक्त धैयशील जाधव, कल्याणचे सहा. पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, माहिती व जनसपंर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा. आयुक्त सुधीर मोकल, किशोर ठाकूर यांच्यासह इतर अभियंता व पोलिस अधिकारी उपस्थित होते.