कल्याण
दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन कल्याणमधील डॉ. मिलिंद ढाले, दिलीप घाडगे आणि बिंदेश सिंग या तिघा स्पर्धकांनी यशस्वीपणे पूर्ण करत नवा अध्याय रचला आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते जोहान्सबर्ग या दोन शहरांदरम्यान २८ ऑगस्ट रोजी ही कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. ज्यामध्ये कल्याण रनर्स ग्रुपच्या माध्यामतून हे तिघेही स्पर्धक सहभागी झाले होते.
दक्षिण आफ्रिका येथे पार पडलेली ही कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेला नुकतेच शंभर वर्षे पूर्ण झाले असून यावर्षी त्यात जगातील पंधर हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दक्षिण आफ्रिकेतील या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन ती पूर्ण करणे हे जगातील सर्व मॅरेथॉन रनर्सचे एक स्वप्न असते. मात्र, त्यातील विविध आव्हाने म्हणजे स्पर्धकांच्या संयम, क्षमता सहनशिलता आदी कौशल्याची परीक्षा घेणारी असतात.
एखादी ४२ किलोमीटर अंतराची पूर्ण मॅरेथॉन चार तास आणि पन्नास मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण केली असेल तरच दक्षिण आफ्रिकेतील या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये प्रवेश दिला जातो. तसेच या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतल्यानंतर ९० किलोमीटरचे हे अंतर १२ तासांच्या आत न थांबता पूर्ण केल्यासच स्पर्धकांना गौरवले जात असल्याची माहिती मुख्य प्रशिक्षक समीर पाटील यांनी दिली. त्याशिवाय ९० किलोमीटरपैकी २१ किमी, ४२ किमी आणि ६५ किमी अंतर हे ठराविक वेळेतच पूर्ण करावे लागते.
अशा सर्व कठीण आव्हानांवर कल्याण रनर्स ग्रुपच्या डॉ. मिलिंद ढाले, दिलीप घाडगे आणि बिंदेश सिंग या स्पर्धकांनी मात करत ही ९० किमी कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केल्याचेही समीर पाटील यांनी सांगितले. दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान असणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये कल्याण रनर्स ग्रुपच्या स्पर्धकांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत.
डॉ. मिलिंद ढाले, दिलीप घाडगे आणि बिंदेश सिंग यांनी ही तब्बल ९० किमीची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण करून कल्याण रनर्स आणि कल्याण डोंबिवलीचे नाव जगाच्या पाठीवर झळकावले आहे. कल्याण रनर्सचे मुख्य प्रशिक्षक समीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर