December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Kalyan: रेल्वे रूळ ओलांडून भक्तांनी दिला बाप्पाला निरोप

कल्याण

गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज गौरी गणपतीला निरोप देण्यात आला. कल्याण डोंबिवली शहराच्या मधोमध असलेल्या ९० फिट रोड कचोरे खंबालपाडा परिसरातील भाविकांनी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून बाप्पाला निरोप दिला. तर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने कचोरे आणि खंबाल पाडा परिसरात कृत्रिम तलावाची व्यवस्था करून देखील गणेश भक्तांनी या ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यासाठी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.

कल्याण आणि ठाकुर्लीच्या दरम्यान असलेल्या कचोरे येथील विसर्जन घाटावर जाण्यासाठी रस्ता नाही. या भागात तलाव नसल्यामुळे बाप्पाच्या विसर्जनासाठी नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून गणेश घाटावर जावे लागते. या भागातील ग्रामदेवतेचे मंदिर देखील खाडी किनाऱ्या लगत रुळापलीकडे आहे. विसर्जनादिवशी या ठिकाणी स्थानिक सागरदेवी सेवक मंडळ आणि पोलिसांच्या मदतीने गणेश भक्तांनी व्यवस्थितरित्या विसर्जन पार पाडले.

नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून खाडी किनारी जावे लागू नये म्हणून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने कचोरे आणि खंबाल पाडा परिसरात कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या कृत्रिम तलावांकडे पाठ फिरवत नागरिक आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत खाडी किनारी जाऊन बाप्पाचे विसर्जन करत आहेत. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पालिका प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने याठिकाणी कठोर पाउले उचलण्याची गरज आहे.