स्मार्टसिटीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आपचा आरोप
कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्टसिटीतील सिमेंट काँक्रीटच्या स्मार्ट रस्त्याला अवघ्या दोन महिन्यातच तडे गेले असून हे तडे बुजविण्यासाठी या रस्त्याला मोठे खड्डे पाडण्यात आले आहे. त्यामुळे केडीएमसीच्या स्मार्टसिटीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कल्याण-डोंबिवली शहरात राबविण्यात येणाऱ्या स्मार्टसिटी प्रकल्पातून ६१ कोटी रुपये खर्चून मंगेशीसृष्टी ते रौनक सिटीपर्यंत सिमेंट काँक्रीटचा स्मार्ट रस्ता उभारण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात या रस्त्याचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. या रस्त्यासाठी केंद्र सरकारने ३१ कोटी रुपये दिले आहेत.
रौनक सिटी ते डॉन बॉस्कोशाळे पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटचे काम दोन महिन्यांपूर्वी झाले असून अवघ्या दोन महिन्यातच या रस्त्याला तडे गेल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. रस्त्यावर पडलेले हे तडे बुजविण्यासाठी याठिकाणी मोठे खड्डे करण्यात आले आहेत.
केडीएमसीच्या स्मार्टसिटीच्या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याने हि कामे निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप आपचे कल्याण पश्चिम अध्यक्ष रुपेश पाटील यांनी केला आहे. यावेळी आपचे केडीएमसी कार्याध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, निलेश व्यवहारे, सुनील घोरपडे, सचिन जोशी, संदीप नाईक, नीलम व्यवहारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर