December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

विषेश मेसेज देणारी एक शॉर्टफिल्म वायरल

मायरा म्हणतेय… मी जर मोबाईल असते तर

· मायरा वायकुळने प्रेक्षकांच्या हृदयाला घातला हात
· सध्या होतेय मायाराची विषेश मेसेज देणारी एक शॉर्टफिल्म वायरल
· मायरा एका नव्या भूमिकेत

विविध व्हीडिओजच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणारी, लहान वयातच सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असणारी चिमुरडी मायरा वायकुळ आता मोबाईल पोल्युशनवर मेसेज देण्यासाठी सज्ज झाली आहे. मोबाईल पोल्युशनवर एक अतिशय समर्पक असणारी अशी काळजाचा ठाव घेणारी शॉर्टफिल्म गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. बऱ्यापैकी व्हायरल झालेल्या या शॉर्टफिल्मचं प्रमुख आकर्षण आहे, तिची कन्सेप्ट आणि मायरा वायकुळ. मुख्य म्हणजे ही शाॅर्टफिल्म मराठी, हिंदी आणि कन्नड अशा तीन भाषांमध्ये बनवली आहे.

मोबाईलमुळे जग जवळ आलं असलं तरी नात्यांमधला जिव्हाळा कुठेतरी हरवत चालला आहे. त्यामुळे ‘सतर्क व्हा’ असा इशारा करणारी ही फिल्म अगदी रोजच्या आयुष्यात घडणारा एक प्रसंग घेऊन आली आहे. छोट्या अनूच्या (मायरा वायकुळ) पाचव्या वाढदिवसाचं जंगी आयोजन केलं जातं. पण वाढदिवसाच्या दिवशी हजर असलेले नातेवाईक मोबाईलमध्ये व्यस्त असतात. एकमेकांच्या समोर असून सुद्धा मोबाइलच्या माध्यमातून कनेक्ट होतात. जेव्हा केक कापण्याची वेळ येते, तेव्हा तर सगळे मोबाईलला समोर धरून तो इव्हेंट शूट करतात. मात्र अनूला हे काही नकोय.. तिला मोबाईलच्या माध्यमातून नात्यांशी जोडायचं नाहीय; तर माणसांच्या सहवासातून नात्यांच्या घट्ट बंधनात गुंफलं जायचंय. तिला मोठ्ठा केक नकोय, मोठाले गिफ्ट नकोयत, तर तिला हवाय ‘वेळ’. या वेळेतूनच तिला हरवत चाललेली नाती जोडायची आहेत. त्या नात्यांमधला जीवंतपणा निर्माण करायचा आहे. तसं ती आग्रहाने सांगत Disconnect to Reconnect… हा महत्त्वाचा मेसेज देते.

नात्यांना जोडणाऱ्या या शॉर्टफिल्मची निर्मिती अद्भुत या निर्मिती संस्थेने केली आहे. या शॉर्टफिल्मची कॉन्सेप्ट कौशिक मराठे यांची असून दिग्दर्शन वैभव पंडित यांनी केलं आहे. शॉर्टफिल्मविषयी वैभव सांगतात, तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय. वेळ वाचत आहे. हे खरंय, पण अशा काही चांगल्या परिणामांचे दुष्परिणामही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे नात्यांमध्ये कृत्रीमता वाढू लागली आहे. माणसं एकमेकांना वेळ देण्यापेक्षा तंत्रज्ञानाला सर्वात जास्त वेळ देत आहेत. तंत्रज्ञानाचे फायदे मानवी नात्यांवर कसा परिणाम करतात हेच तर आम्ही शॉर्टफिल्ममधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी आम्ही मोबाईलचं उदाहरण शॉर्टफिल्ममध्ये दिलं आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण शॉर्टफिल्मद्वारे केलेला हा प्रवास स्वागतार्ह आहे.

कौशिक मराठे म्हणतात की, आजकाल सणासमारंभात सगळेच मान खाली घालून मोबाईलमध्ये अडकलेले दिसतात. अशीच परिस्थिती घराघरांतून दिसते. त्यामुळे अजाणतेपणी आलेले हे संकट पुढे नात्यांमध्येआणि किती अंतर वाढवेल, या विचाराने मी डिस्टर्ब झालो. म्हणून हा मेसेज देणारी ही फिल्म आम्हाला करण्याची गरज भासली. मोबाईलच्या माध्यमातून आम्हाला आपल्याला Disconnect to Reconnect…हा महत्त्वाचा मेसेज देणं सोप्पं गेलं आहे. अद्भुत क्रिएटिव्हज आणि मायरा या दोघांनी आमच्या संकल्पनेला समाधानकारक स्वरूप दिलं आहे.’

‘आपल्या कन्व्हींसिंग बोलण्यातून Disconnect to Reconnect हा मोलाचा संदेश देणारी मायराची शॉर्टफिल्म पहिली नसेल तर अवश्य पाहा. ‘तुझी माझी रेशीमगाठ’ मधल्या ‘परी’नंतर मायराची या ‘शॉर्टफिल्म’ मधली ‘अनू’ही सर्वांना खूप आवडतेय आणि वायरल होतेय.