December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

अरिहंत या पहिल्या पाणबुडीवरुन प्रेरीत होऊन बनवला आराखडा

Kalyan : दुर्गाडी परिसरातील आरमाराच्या जागेची पाहणी

कल्याण

पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात स्मारक स्वरुपात भारतीय नौदलाची युध्द नौका टी-८० विराजमान करण्याबाबत भारतीय नौदल आणि एसकेडीसीएल यांच्या मध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. या पार्श्वभुमीवर नौदलाचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी व्हाईस ॲडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी आज केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासमवेत दुर्गाडी परिसरातील आरमाराच्या जागेची पाहणी केली.

केडीएमसीने आरमाररुपी स्मारक उभारण्यासाठी खुप चांगलं ठिकाण निवडलं आहे. या माध्यमातून पर्यटकांना व विदयार्थ्यांना नौदलाच्या तसेच शिवकालीन इतिहासाबाबत माहिती उपलब्ध होईल आणि महापालिका युध्द नौकेच्या स्वरुपात उभारत असलेल्या स्मारकाच्या रुपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीतील इतिहास पुन्हा जिवंत स्वरुपात सर्वांसमोर उभा राहील असे मत यावेळी सेवानिवृत्त व्हाईस ॲडमिरल एस.व्ही.भोकरे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यानजीक मराठा आरमाराची सुरुवात केली. त्याच दुर्गाडी किल्याच्या परिसरामध्ये एसकेडीसीएलतर्फे रिव्हरफ्रन्ट डेव्हलपमेंट केले जात आहे. या रिव्हरफ्रन्ट डेव्हलपमेंटचा एक भाग म्हणून इथे नौदल संग्रहालय (नेव्हल गॅलरी) स्थापन होत आहे. ही नेव्हल गॅलरी एक सबमरीन प्रोटोटाइप असेल तिचा आराखडा भारतीय नौसेनेच्या सबमरीननुसार आरेखित केला जाणार आहे. सुमारे १११ मीटर लांब असलेल्या या सबमरीनच्या गॅलरीमध्ये १७ व्या शतकापासून ते १८ व्या शतकापर्यंत मराठा योध्यांच्या आरमारांचा इतिहास तसेच ब्रिटीशांच्या रॉयल नेव्हींपासून स्वतंत्र भारताच्या नौसेनेचा आजपर्यंत इतिहास प्रसिध्द केला जाईल.

हा इतिहास ही माहिती पेंटींग, शिल्प, मॉडेल व मल्टीमिडियाच्या स्वरुपात प्रदर्शित केली जाईल. या सबमरीनच्या जडणघडणीमध्ये सबमरीन्सच्या मुख्यालयातील अधिका-यांची मदत घेण्यात आली आहे. भारताच्या अरिहंत या पहिल्या पाणबुडीवरुन प्रेरीत होऊन या सबमरीनसचा आराखडा बनवण्यात आला असल्याची माहिती एसकेडीसीएलचे हेरिटेज व्यवस्थापन सल्लागार सचिन सावंत यांनी दिली. या प्रकल्पाची संकल्पना महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मांडली होती. सेवानिवृत्त व्हाईस ॲडमिरल एस.व्ही. भोकरे यांनी या प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले आणि भावी काळातही वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी एसकेडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, महापालिका सचिव संजय जाधव, परिमंडळ-१ चे उपायुक्त धैर्यशील जाधव व इतर अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.