December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Dombivali : सांस्कृतिक उपराजधानीच्या वाचन संस्कृतीची वाढणार शान

पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला श्रीगणेशा

डोंबिवली

जागतिक स्तरावर उंची गाठलेल्या डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून होत असलेल्या पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमाच्या पाचव्या वर्षीच्या सोहळ्याला यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून त्यांनी त्या उपक्रमाचा श्रीगणेशा मंगळवारी स्वतः कडील बहुभाषिक पुस्तकांचे आदान प्रदान करून केला.

त्यामुळे राज्यातील बहुतांशी ग्रंथालय, वाचनालय आदींसह पुस्तक प्रेमींना या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याचा विश्वास आदान प्रदान सोहळ्याचे मुख्य आयोजक पुंडलिक पै यांनी केला. डोंबिवलीत २० ते २९ जानेवारी या कालावधीत येथील सावळाराम क्रीडा संकुलात होणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे निमंत्रण सार्वजनिक बांधकाम मंत्री, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पैंसह सामाजिक कार्यकर्त्या वृंदा भुस्कुटे, दीपाली काळे आदींसह मान्यवरानी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. वाचनप्रिय फडणवीस यांनी तात्काळ त्या उपक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

वाचकांसाठी ही पर्वणी असून डोंबिवलीत त्याचे सातत्याने आयोजन केले जात आहे ही कौतुकाची बाब असून त्या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचेही आश्वासन फडणवीस यांनी दिले.

फडणवीस यांनी स्वतः कडील दहा पुस्तकांचा संच तातडीने आदान म्हणून पै समूहाला दिला आणि त्याबदल्यात पै यांनीही त्यांना प्रदान स्वरूपात पुस्तके परत दिली, त्यामुळे त्या आमंत्रणाची भेट अविस्मरणीय झाल्याची प्रतिक्रिया वृन्दा भुस्कुटे यांनी दिली.

पुस्तक आदान प्रदान सोहळा हा आता पै यांचा राहिला नसून तो डोंबिवलीकर नागरिकांचा वाचकोत्सव झाला आहे, हजारो नागरिक आबालवृद्ध त्यात सहभागी होतात याचा निश्चित आनंद असून यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असल्याने त्याचा आनन्द वाढला असून शहराच्या सांस्कृतिक जडण घडणीत मानाचा तुरा असल्याची प्रतिक्रिया मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.