December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

संविधान दिन राहनाळ शाळेत संपन्न

Bhiwandi : संविधान म्हणजे आपल्याला मिळालेली मोठी देणगी – भोईर

संविधान दिन राहनाळ शाळेत उत्साहात संपन्न

भिवंडी

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. त्यांनी अहोरात्र कष्ट करून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाला, देशातील जनतेला एका सूत्रात बांधणारे संविधान तयार केले. हे संविधान अलौकिक असल्याचे उद्गार राहनाळ ग्रामपंचायतच्या सदस्या मनिषा भोईर यांनी जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी काढले.

जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला. दिवसभर शाळेत विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, त्याचबरोबर संविधानाची उद्देशिका पाठांतर या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि तसेच संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राहनाळ गावातील समाजसेवक दिपक भोईर, ग्रामपंचायत सदस्या मनिषा भोईर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मनाली जाधव, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी संविधान तयार करण्याचा प्रवास विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला. रसिका पाटील यांनी न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्षता, सार्वभौम या संविधानातील मूल्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संविधान उद्देशिका पाठांतर स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना दिपक भोईर व मनिषा भोईर यांच्याकडून ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आल्या. यामध्ये प्रथम क्रमांक श्रेयस कुंभार, द्वितीय क्रमांक खुशी राजभर, तृतीय क्रमांक ऋषीकेश शिंदे, उत्तेजनार्थ हर्षदा, प्रिया पांडे, राज या विद्यार्थ्यांचा ट्रॅाफी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संध्या जगताप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिज्ञासा कडू, सुप्रिया पाटील यांनी मेहनत घेतली.