केडीएमसी विद्युत विभागाने केले सादरीकरण
कल्याण
वसुंधरा दिनांतर्गत केडीएमसीच्या विद्युत विभागाने सौर उर्जेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सौरऊर्जेच्या प्रचार-प्रसारासाठी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली केडीएमसी मुख्यालयात पथनाट्य सादर केले.
देशातील 70 टक्के वीज निर्मिती ही कोळशावर आधारित होत आहे. मात्र, आता जगाच्या पाठीवर कोळशाचे आयुष्य पुढील 90 वर्षांचे असून त्यानंतर हे कोळशाचे साठे संपुष्टात येणार आहेत. परिणामी याला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. भारताला सौर ऊर्जेचे वरदान असून त्याचा वापर हीच काळाची गरज असल्याचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी ही पथनाट्य सादर केली जाणार आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये 100 सार्वजनिक ठिकाणी त्यांचा प्रयोग करण्याचा मानस असल्याची माहिती त्यांनी दिली.
तर, सौर ऊर्जा ही क्लीन आणि ग्रीन एनर्जी असून नागरिकांनी अधिकाधिक त्याचा वापर करून कल्याण डोंबिवलीसह देशाचे पर्यावरण संवर्धन करण्यात हातभार लावावा असे आवाहनही यावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केले.
यावेळी केडीएमसी उपआयुक्त अतूल पाटील यांच्यासह इतर पालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.











Leave a Reply