December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

KDMC : गोवर लसीकरण करण्याचे केडीएमसीचे आवाहन

कल्याण

शासन निर्देशानुसार १५ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विशेष गोवर लसीकरणाची पहिली फेरी राबविण्यात आली. या मोहिमेत ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील जे लाभार्थी लसीकरणास पात्र होते किंवा ज्यांचा गोवर लसीचा पहिला किंवा दुसरा डोस चुकला होता अशा लाभार्थ्यांचे घरोघरी सर्वेक्षण करुन शोध घेण्यात आला व त्यांचे गोवर लसीकरण जवळच्या आरोग्य केंद्रात व बाह्य लसीकरण सत्रात पूर्ण करुन घेण्यात आले. या मोहिमेत MR-१ चा पहिला डोस ७३९ लाभार्थ्यांना व MR-२ चा दुसरा डोस ७९४ लाभार्थ्यांना देऊन ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली.

तसेच, शासनाच्या निर्देशानुसार मोहना नागरी आरोग्य केंद्र २ गोवर रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने या विभागात १६ डिसेंबर रोजी गोवर उद्रेक जाहिर करण्यात आला. उद्रेक जाहिर केल्यानंतर या विभागात आरोग्य केंद्राच्या कर्मचा-यांद्वारे घरोघरी सर्वेक्षण करुन ६ महिने ते ५ वर्ष वयोगटातील आजपर्यंत एकूण ३१३७ इतक्या लाभार्थ्यांना अतिरिक्त डोस देण्यात आला व अजूनही सर्वेक्षण करुन पात्र लाभार्थ्यांना आरोग्य विभागामार्फत मोफत गोवर लस देण्यात येईल.

गोवर हा आजार लसीकरणाद्वारे टाळता येऊ शकतो. तरी १५ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत होणा-या विशेष गोवर लसीकरण मोहिमेच्या दुस-या फेरीत गोवर लसीकरणास पात्र असलेल्या लाभार्थ्यांचा गोवर लसीचा पहिला किंवा दुसरा डोस चुकला असल्यास नजिकच्या आरोग्य केंद्रात जाऊन मोफत गोवर लसीकरणाचा डोस घेण्यात यावा असे आवाहन केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांचेमार्फत करण्यात आले आहे.