December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

भाजपा महिला मोर्चाने केला पोलिसांचा सन्मान

Kalyan : एमएफसी पोलिसांवर होतोय कौतुकाचा वर्षाव

कल्याण

चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही दिवसांत अटक करणाऱ्या महात्मा फुले चौक पोलिसांचा भाजपा महिला मोर्चाने सन्मान केला. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रिया शर्मा, कल्याण शहर महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती भोईर, माया दळवी, कविता वर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण स्टेशन परिसरात एका ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना १ डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. यानंतर या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांसमोर होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने, पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील, एपीआय दिपक सरोदे, सागर चव्हाण तसेच इतर पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी कोणतेही धागेदोरे हाती नसताना अगदी शिताफिने दिवस-रात्र एक करून या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केली.

पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे न्याय सर्वाना सारखाच असतो अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे. गुन्हा घडल्यावर पोलिसांना जाब विचारणारे अनेक असतात मात्र गुन्ह्याचा शोध लावल्यावर कौतुक करणारे फार कमी असतात. पोलिसांच्या याच कामाचे कौतुक करण्यासाठी भाजपाच्या महिला मोर्चाच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुष्पगुच्छ देत सन्मान केला व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.