October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना गणेश मुळ्ये

Kalyan : शासनाची ‘ती’ भूमिका स्वागतार्ह – गणेश मुळ्ये

प्रेस क्लब, कल्याणच्या वतीने पत्रकार दिन साजरा

कल्याण

पत्रकारांसाठीचे कायदे-निकष बदलण्याची गरज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली असून त्यासाठीची प्रक्रिया सरकार करतेय ही आनंदाची – स्वागताची बाब असल्याचे प्रतिपादन कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) गणेश मुळ्ये यांनी प्रेस क्लब, कल्याणच्या वतीने शुक्रवारी आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले.

पश्चिमेतील श्री स्वामीनारायण हॉल येथे आयोजित कार्यक्रमास यावेळी कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) गणेश मुळे, केडीएमसीचे आयुक्त मंगेश चितळे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, महापालिकेचे सचिव संजय जाधव, महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णुकुमार चौधरी यांनी तर सूत्रसंचालन अतुल फडके यांनी केले. याप्रसंगी कोरोना काळात गरजूंना अन्न पुरवठा करण्यात पुढाकार घेणारे दिनेश ठक्कर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष कुणाल म्हात्रे, सचिव अतुल फडके, कोषाध्यक्ष सचिन सागरे, सभासद प्रविण आंब्रे, रमेश दुधाळकर, दत्ता बाठे, रवी चौधरी, सल्लागार आनंद मोरे आदींसह इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुळ्ये पुढे म्हणाले की, पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका न मिळणे, पारितोषिक न मिळणे, आरोग्याच्या सुविधा न मिळणे व इतर बाबी भविष्यात मार्गी लागतील. पत्रकारितेचा इंटरनेट, सोशल मिडीयाचा प्रवास आपण पाहिला आहे. नव्या सोशल मिडीयाचा संदर्भ देत मुळ्ये पुढे म्हणाले की, एक माध्यम दुसऱ्या माध्यमाला मारत नाही तर एकमेकांना सशक्त करतात. चॅनेल्सची संख्या वाढली आहे. वृत्तपत्रांची संख्याही बरीच आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांची नाळ वृत्तपत्रांशी कशी जोडली गेली आहे याचे त्यांनी एक उदाहरणही दिले. आज बातमीकडे कसे बघावे ते ग्रामीण व छोट्या शहरातील वृत्तपत्रांकडे पाहून कळते, असेही ते म्हणाले. विकास वार्ता पारितोषिक विभाग स्तरावर दिले जातात. या पुरस्कारासाठी आम्हाला पत्रकारांना फोन करावे लागतात. चांगले लिहिणाऱ्या पत्रकारांकडे दु:ख काय असते की, त्यांच्याकडे बातम्यांची कात्रणे ठेवत नाहीत. त्यांनी कात्रणे ठेवली पाहिजेत. ती नसल्याने कोकण विभागातील पत्रकारांचे प्रतिनिधीत्व कमी पडते. या निमित्ताने संकल्प करूया की, पुढील वर्षी कोकण विभागातील सहाच्या सहा पुरस्कार ठाणे जिल्ह्याला मिळावेत यासाठी आपण प्रयत्न करूया, असे आवाहन मुळ्ये यांनी केले.

सोशल मिडियामध्ये ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, विभागीय माहिती कार्यालय सोशल मिडियामध्ये राज्याला बातमी देण्याचे काम करतो. आपण पत्रकार दिन साजरा करतो म्हणजे काय करतो तर आत्मचिंतन करण्याचा हा दिवस आहे. पत्रकारितेत मानवी मुल्ये जपली तरच पत्रकारिता टिकेल. वृत्तपत्र चालविण्यासाठी जाहिरात येणे आवश्यक आहे आता वृत्तपत्राचे अर्थशास्त्र बदललेले आहे. त्यामुळे सोशल मिडियाकडे लोक वळल्याचे मुळ्ये यांनी सांगितले.

महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे याप्रसंगी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, शासकीय अधिकाऱ्याची भूमिका मी म्हणेन तो कायदा अशी असते. मला शासकीय सेवेत असताना वरिष्ठांनी मला मनोभूमिकेत बदल करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी पत्रकारांची भूमिका समजून घेतली. तेव्हा लक्षात आले कि, पत्रकारांची टीका सकारात्मक घेतल्यास त्रास होत नाही. केडीएमसी प्रशासकीय राजवट सुरु असल्याचा संदर्भ देत चितळे यांनी जेव्हा लोकप्रतिनिधींची राजवट नसते तेव्हा लोकांची भूमिका पत्रकार निभावतात, त्रुटी दाखवतात. तेव्हा आम्हाला त्रुटी दूर करून योग्यप्रकारे योजना राबवता येतात, असे सांगत पत्रकारितेचे महत्व अधोरेखित केले.

ठाणे जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात म्हणाले की, शासनाच्या पत्रकारांसाठी अनेक योजना आहेत. यात आरोग्य, अधिस्वीकृती पत्रिका, पुरस्कार दिले जातात. विभागीय माहिती व जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकारांनी संपर्क साधल्यास त्यांना सविस्तर माहिती देऊन सहकार्य केले जाईल असे आश्वासित करीत वाघमारे यांनी शंकरराव चव्हाण कल्याण मदत निधीच्या माध्यमातूनही पत्रकारांना मदत केली जात असल्याचे सांगितले.