कल्याण
कायद्याने वागा लोकचळवळ आयोजित बहुचर्चित फातिमाबी-सावित्री उत्सव व फातिमाबी-सावित्री पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, २८ जानेवारी रोजी पश्चिमेतील के. सी. गांधी शाळेच्या प्रेक्षागृहात होणार असून या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी अॅड. उदय रसाळ यांची निवड करण्यात आली आहे.
राज असरोंडकर यांनी स्थापन केलेल्या कायद्याने वागा लोकचळवळीचं फातिमाबी-सावित्री उत्सवाचं यंदाचं नववं वर्ष आहे. या कार्यक्रमाला यापूर्वी रामनाथ सोनवणे, रविंद्र आंबेकर, किरण सोनवणे, संजय आवटे, प्रतिमा जोशी, कुंदा प्र. नि., प्रज्ञा पवार, उर्मिला पवार, निलेश खरे, डॉ. विनोद कुमरे, सुषमा देशपांडे, डॉ. नीतिन आरेकर, मुमताज शेख, हरी नरके, डॉ. गणेश देवी अशा कला, साहित्य, पत्रकारिता, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आहे.
अॅड. रसाळ गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. कल्याण विकासिनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक नागरी समस्यांबाबत आवाज उठवला आहे. त्यांनी केडीएमसीत कल्याण पूर्वेचं निर्वाचित लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे. राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळासोबतही ते कार्यरत होते. अॅड. रसाळ यांची वैचारिक बांधिलकी कायम पुरोगामी विचारांची राहिली आहे. ते समाजमाध्यमांतही स्पष्टपणे अभिव्यक्त होत असतात.
अॅड. रसाळ यांच्या सामाजिक कार्यप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची संधीही आम्हाला फातिमाबी-सावित्री उत्सवाच्या निमित्ताने घ्यायची आहे. त्यामुळेच त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी होकार कळवल्यावर त्यांचे नाव स्वागताध्यक्ष म्हणून निश्चित करण्यात आले, असं कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांनी सांगितलं.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर