उल्हासनगर
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग,मंत्रालय,राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा ‘उत्कर्ष २०२२-२३’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील १७ विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघांनी सहभाग नोंदविला. यात नृत्य, संगीत,साहित्य, ललित कला, छायाचित्रण आणि नाटक अशा विविध विभागातील स्पर्धा घेण्यात आल्यात. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या १८ विद्यार्थ्यांच्या संघाने सहभाग घेत पथसंचलनात प्रथम क्रमांक पटकावला.
त्यासोबतच नृत्य स्पर्धेत पारंपारिक नृत्य या प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला. यात विद्यार्थ्यांनी नर्मदा आणि गंगा नद्यांचे प्रदूषण, त्याची कारणे आणि त्यावरील उपाय नृत्यातून स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या या संघाचे व्यवस्थापन उल्हासनगर मधील एसएसटी महाविद्यालयाचे प्रा. मयूर माथूर यांनी केले. तसेच स्पर्धेपूर्वी एसएसटी महाविद्यालयात या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथे विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षित केले.
या शिबिराच्या आयोजनासाठी एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पुरस्वानी, उपप्राचार्य आणि एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचारे यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल मुंबई विद्यापीठाचे एनएसएसचे संचालक सुधीर पुराणिक, कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर, ओएसडी सुशील शिंदे, एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरस्वानी, सर्व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह