December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

भाविक-भक्तगणांकडून वधुवरांवर पुष्पवर्षाव

निरंकारी सामूहिक विवाह सोहळ्यात 48 जोडपी विवाहबद्ध

ठाणे

महाराष्ट्राच्या 56 व्या निरंकारी संत समागमाची विधिवत सांगता झाल्यानंतर बिडकीन डीएमआयसी येथील मैदानावर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सान्निध्यात अत्यंत मंगलमय वातावरणात 48 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.

साध्या व सामूहिक विवाहांना चालना देण्याच्या संत निरंकारी मिशनच्या सामाजिक सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत साधेपणाने, पण तरीही अत्यंत प्रभावशाली स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपारिक ‘जयमाला’आणि प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात ‘सामायिक हार’घालून करण्यात आला. त्यानंतर सुमधूर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या चार ‘निरंकारी लांवां’चे (मंगलाष्टका) गायन करण्यात आले. प्रत्येक ‘लांवां’च्या शेवटी सद्गुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजी तसेच विवाहासाठी आलेले नवदांपत्यांचे नातलग व उपस्थित भाविक-भक्तगणांकडून वधुवरांवर पुष्पवर्षाव करण्यात आला.

विवाह समारोहाच्या शेवटी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नवविवाहित दांपत्यांना आपल्या दिव्य वाणी द्वारे पावन आशीर्वाद प्रदान करताना सांगितले, की या समारोहामध्ये वर-वधूंचे वैवाहिक नाते जोडले गेल्याने दोन्ही बाजुच्या परिवारांचे मिलन घडून आले आहे. त्यांनी एकमेकांचा मनापासून स्वीकार करावा. वर-वधूंनी आपसात ताळमेळ ठेवून प्रेम, नम्रता यांसारख्या दिव्य गुणांचा अंगिकार करावा आणि जीवनात येणाऱ्या अडी-अडचणींची सोडवणूक करावी.

निरंकारी विवाहांचे वैशिष्ट्य असलेला सामायिक हार हा गृहस्थीची जबाबदारी पती-पत्नी दोघांचीही समान आहे. त्यांनी आपल्या जीवनात सत्संग, सेवा आणि स्मरण करत निराकार प्रभूला प्राथमिकता द्यावी.  शेवटी  सद्गुरु माताजींनी नव विवाहित दांपत्यांच्या जीवनात आध्यात्मिक पैलू सदृढ राहावा आणि त्यांचे जीवन आनंदमय व्हावे, अशी मंगल कामना केली.

हा विवाह सोहळा आंतरराज्यीय स्वरुपाचा होता. महाराष्ट्रातील मुंबई, औरंगाबाद, चिपळूण, नाशिक, सोलापूर, डोंबिवली, सातारा, नागपूर, रायगड, पुणे, कोल्हापूर आणि अहमदनगर  क्षेत्रातील वर-वधू या विवाह सोहळ्यात सहभागी होते. या व्यतिरिक्त पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथूनही वर-वधू आले होते.