कल्याण
जागतिक महिला दिनानिमित्त पश्चिमेतील दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्ट संचालित कै. भाऊराव पोटे माध्यमिक विद्यालयात विविध क्षेत्रातील महिलांना आमंत्रित करून त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान शाळेचे संचालक मंडळ मीनल पोटे व बिपिन पोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
पोटे विद्यालयाच्या भव्य अशा पटांगणामध्ये सुरेख रांगोळी व सजावट करून जागतिक महिला दिनी वेगवेगळ्या क्षेत्रातील आठ महिलांना आमंत्रित करून त्यांच्या कार्यांचा आढावा घेतला. त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रत्येक उपस्थित मान्यवरांनी आपले अनुभव तसेच कार्याचा थोडक्यात परिचय विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांच्या भाषणातून मांडला.
व्यासपीठावर कवयित्री लेखिका सुरेखा गावंडे, चित्रपट अभिनेत्री सविता हांडे, अंबरनाथ जयहिंद को ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालिका व स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापिका वर्षा कळके, वृत्तनिवेदिका ललिता मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता नीता घरत, गायिका नंदा नांद्रेकर, नाट्यनिर्माती व दिग्दर्शक रश्मी घुले, खेळाडू जागृती चव्हाण, पत्रकार सजना नांबियार अश्या विविध क्षेत्रातील व ज्यांनी समाजात आपला ठसा उमटवून कर्तृत्व दाखवत आहेत अशा महिलांचा हा गौरव सन्मान शाळेचे संचालक मीनल पोटे व बिपिन पोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी या शाळेतील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांचा देखील गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने व शिस्तीने उपस्थित राहून सर्व मान्यवरांचे मनोगत, त्यांचे विचार शांततेने श्रवण केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुरेश वामन यांनी केले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर