एक दिवसीय निरंकारी संत समागम हर्षोल्हासपूर्ण वातावरणात संपन्न
बदलापूर
‘‘परमात्मा पूर्ण आहे आणि त्याने प्रदान केलेली परिस्थितीदेखील पूर्ण आहे. फरक आहे तो आपल्या दृष्टिकोनाचा. आपण त्या परिस्थितीकडे कसे पाहतो, त्याचा मतितार्थ काय काढतो आणि त्यातून काय शिकवण प्राप्त करतो यावर सर्वकाही अवलंबून आहे. एक दृष्टिकोन असा असतो, की जर परिस्थिती आपल्या अनुकूल नसेल तर आपण परमात्म्यालाच दोष देऊ लागतो; पण दुसऱ्या बाजुला जर आपला आध्यात्मिक पैलू मजबूत असेल तर परिस्थिती अनुकूल नसूनही आपण यातही काहीतरी ईश्वराचे वरदान लपलेले असेल असा विचार करुन मन विचलीत होऊ देत नाही. भक्तांचा सदोदित हाच सकारात्मक द़ृष्टिकोन राहिलेला आहे.” असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी शुक्रवारी बदलापूर येथील अंबरनाथ क्रिडा संकूलावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय निरंकारी संत समागमामध्ये उपस्थित मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.
या समागमामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त मुंबई, नवी मुंबई, पनवेल आदि भागांतून हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण आणि ईश्वरप्रेमी सज्जनांनी भाग घेतला. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या दिव्य दर्शनाने भक्तांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. अनेक मान्यवर व्यक्तींनीही या समागमामध्ये सहभागी होऊन दिव्य युगुलाचे दर्शन घेतले व आशीर्वाद प्राप्त केले.
सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की प्रभु भक्त आणि इतर मानवांच्या शारीरिक संरचनेमध्ये कोणताही फरक नसतो तरीही भक्तांचे जीवन सर्वसामान्य लोकांपेक्षा वेगळे दिसते याचे कारण त्यांनी ब्रह्मज्ञानाद्वारे परमात्म्याचे दर्शन प्राप्त करुन आपल्या अंतरात एक परिवर्तन अनुभवलेले असते. या अनुभूतीनंतर ते क्षणोक्षणी ईश्वराच्या जाणीवेमध्ये राहून आपले जीवन सहज-सुंदर रीतीने व्यतीत करत असतात. अशा भावनेने युक्त होऊन भक्त जेव्हा जीवन जगतो तेव्हा त्याचा जीवनाच्या प्रति पाहण्याच्या दृष्टीकोन सकारात्मक बनून जातो.
या समागमामध्ये अनेक भक्तगणांनी व्याख्यान, भजन, भक्तिगीतं आणि कविता इत्यादिंच्या माध्यमातून आपले भाव व्यक्त केले आणि मनुष्य जीवनाच्या सार्थकतेमध्ये आध्यात्मिकतेचे महत्व अधोरेखित केले.
आणखी बातम्या
फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग!
गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर
सातरस्ता येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान