विविध कलाक्षेत्रातील महिला, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केली कला
मुंबई
विविध कलाक्षेत्रातील महिलांच्या सादरीकरणाने नटलेला `मी आनंदयात्री’ महिला कलामहोत्सव २०२३ या चार दिवसीय कार्यक्रमाची सांगता रविवारी पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात झाली. ९ मार्च ते १२ मार्च या चार दिवसात विविध कलाक्षेत्रातील महिला, मुंबईच्या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी आपली कला सादर केली. पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्या आभार प्रदर्शनाने या महोत्सवाचा समारोप झाला. बुधवारी अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाले. यावेळी पु. ल. देशपांडे कला अकादमी महाराष्ट्र शासन आणि संगीत नाटक अकादमी भारत सरकार यांच्या वतीने लोककला क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवर महिलांना सन्मानित करण्यात आले. त्यात आदिवासी महिला ताई धिड्या, लावणी कलावती सिने अभिनेत्री राजश्री नगरकर, महिला शाहिर कल्पना माळी, लोककलावंत सरला नांदुरेकर, भजनसम्राज्नी गोदावरी मुंडे, भारुड सम्राज्नी चंदाबाई तिवाडी, शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणार्या भावना गवळी, विद्या साठे, प्रगती भोईर, कुंदाताई पाठक यांना मिळाले.
रविवारी १२ मार्च रोजी मुंबईतील नामांकित महाविद्यालय एम.एल. डहाणूकर महाविद्यालय, साठये महाविद्यालय, रुपारेल कॉलेज, झेव्हियर्स कॉलेज, रुईया कॉलेज, वझे कॉलेज आदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. दुपारी “मुद्रा क्रिएशन”च्या माध्यमातून सुगंधा धुळप यांनी सहकाऱ्यांसह लोकनृत्य सादर केले. सायंकाळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील आणि सहकाऱ्यांनी “नित्या आर्टिस्ट सेंटर” संवाद -मी आनंदयात्री हा कार्यक्रम सादर केला. ”भैरवी” मिले सूर मेरा तुम्हारा, स्वरवंदना- लतादिदींच्या गाण्यांचे सादरीकरण भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालयाचे संस्थाचालक पंडित उपेंद्र भट्ट आणि त्यांच्या विद्यार्थिनी यांनी केले. या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कलादालनात गीत-दीप आर्टचे स्नेहल प्रदीप आणि ग्रुप यांचे स्त्री व्यक्तिरेखांवर आधारित रांगोळी प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य़ ठरले.
गुरुवार, ९ मार्च पासून `मी आनंदयात्री’ महिला कलामहोत्सव २०२३ या महोत्सवास प्रारंभ झाला. गुरुवारी “सौ.सुशीला पृथ्वीराज चव्हाण प्रतिष्ठान” भक्तीरंग शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम ही नृत्यकला लोअर परळच्या तेजस्विनी चव्हाण आचरेकर आणि सहकाऱ्यांनी सादर केली. आव्हान पालक संघ -विशेष व्यक्तिंकरिता पालकांनी चालवलेली कार्यशाळा या शाळेच्या मुलांनी आपली कला सादर केली. सोलापूरचे स्वरश्री महिला भजनी मंडळाच्या मंगला अरुण बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध कलागुण दर्शन भजनाद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले. “नाच गं घुमा” द्वारे पनवेलच्या सुनीता खरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अन्नपूर्णा स्तोत्र, जागर शक्तीचा, भारूड, टिपऱ्या ही कला सादर केली. डोंबिवलीचे “मी एकलव्य आर्ट फाऊंडेशन”चे समृद्धी चव्हाण, सुनीता पोद्दार यांनी ग्रुप परफॉर्मन्स सादर केला. गुरुवारची सांगता विलेपार्ले येथील रंगवेधचे कलाकार प्रस्तुत “तेथे कर माझे जुळती”कार्यक्रमाने झाली.
तिसऱ्या दिवशी शुक्रवार, १० मार्च रोजी काव्यशैली क्रिएशन प्रस्तुत कॅलिडोस्कोप ही मराठी एकांकिका कविता विभावरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केली. दुपारी पुण्याच्या मुक्ता बाम आणि सहकारी यांनी “यात्रा”- वारीचा प्रवास हा कार्यक्रम सादर करत रखरखत्या उन्हात भक्तीचा शीतल शिडकावा केला. तर दुपारी ३.३० वाजता दादरच्या आचार्य अत्रे समितीने “अत्रे कट्टा” द्वारे महिलांशी संलग्न कायद्याची माहिती दिली. संध्याकाळी “व्हय! मी सावित्रीबाई” हा क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुलेंवरील कार्यक्रम उज्वल मंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर करत भारताच्या स्त्रीशिक्षणाच्या उद्गातीला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर संपदा जोगळेकर- कुलकर्णी आणि हर्षदा बोरकर यांनी “स्त्री” कविता, अभिवाचन, कथा सादर केल्या. सायंकाळी ७ वाजता कामोठे, नवी मुंबई येथील “सॅलिटेशन डान्स अकॅडमी”च्या दीपिका आनंद आणि सहकारी यांनी ‘कथ्थक’ या भारतीय नृत्यशैलीचे सादरीकरण केले. शेवटी खोपोली येथील ज्योती शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह रात्री ८ वाजता “ओवी रंग”- ओव्या जात्यावरच्या, गप्पा नात्यावरच्या हा कार्यक्रम सादर करत नात्यांचे विविध पदर उलगडले.
शनिवार, ११ मार्च रोजी “पंचमी कला अकादमी” च्या वैशाली जोशींनी आपल्या सहकाऱ्यांसह महिला दिन स्पेशल कथ्थकने दिवसाची सुरुवात केली. दुपारी “या जगण्यावर शतदा प्रेम करावे” द्वारे शुभा जोशी यांनी सहकाऱ्यांसह सकारात्मक व आनंददायी गाणी गायली. सायंकाळी “पु.ल.देशपांडे कला अकादमी” आणि “लोकमत” यांच्या संयुक्त विद्यमाने व सखी मंचच्या वतीने “जल्लोष आरोग्याचा” हा कार्यक्रम सादर झाला. डोबिवलीच्या श्वेता राजे यांनी सहकाऱ्यांसह “सूर निरागस” हा संत साहित्यावरील मराठी वाद्यवृंद सादर केल्याने वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघाले. रात्री ८ वाजता घाटकोपरच्या विधी साळवी यांनी त्यांच्या बॅडसह फ्युजन ब्रँड ग्रुप द्वारे गोवा वसईची फ्युजन मधुर गाणी सादर केली. काही वेळासाठी रसिकांना गाण्यांच्या माध्यमातून गोवा अनुभवता आला.
महोत्सवाच्या समारोपाचे आभार प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी केले. कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. तर या महोत्सवात कला सादर केलेल्या कलाकारांचे विशेष आभार मानले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह