December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

‘मधली भिंत’ लघुपटाच्या चित्रीकरणाला सुरवात

कल्याण

कुटुंब हा एकसंघ राहिला पाहिजे. घरात पडलेली मधली भिंत ही फारच दुःखदायक घटना असते असे उद्गार “मधली भिंत” या लघुपट चित्रीकरणच्या शुभारंभप्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर मोरेश्वर यांनी काढले. आर्या फिल्म प्रोडक्शन तर्फे “मधली भिंत” हा लघुपट तयार केला जात आहे. या लघुपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन शिक्षकीपेक्षा असलेले अजय पाटील यांनी केले आहे. डीओपी, एडिटिंग संतोष शिंदे, मेकअप सोहम कोचरेकर, गीत अनिल शहाकर यांचे आहे.

नुकताच या लघुपटाचा शानदार शुभारंभ सोहळा भालगावातील जीवन मढवी यांच्या घरी संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, माजी नगरसेवक गणेश भाने, हरिभक्त परायण शंकर महाराज म्हात्रे, निर्माते अजय यादव आणि राकेश यादव उपस्थित होते. लघुपटात मेघन गुप्ते, श्रीरंग दाते, प्रदीप सरवदे, प्रिती बोरकर, उज्वला कोठावदे, अजय पाटील, विनया घुगरे, प्रियंका डांगे, जीवन मढवी, पुष्पा थोरात या कलाकारांनी अभिनय केला आहे.

“मधली भिंत” हा एक सामाजिक लघुपट असून हा लघुपट समाजामध्ये अनेक घटकांना सकारात्मक विचार करायला भाग पाडेल, अशा आशावाद मोरेश्वर भोईर यांनी व्यक्त केला. ह. भ. प. शंकर महाराज म्हणाले “समाजात वावरत असताना मधली भिंत कुणाच्याही घरात असू नये. सर्वांनी एकत्रित कुटुंब पद्धतीचा अवलंब करून आपले जीवन सुखी, समाधानी आणि संपन्न करावं. हा लघुचित्रपट आज बनवला जात आहे जेव्हा याची नितांत गरज आहे आहे. दिग्दर्शकांना आणि टिमला भरपूर शुभेच्छा.” गणेश भाने यांनीही या लघुपटाला शुभेच्छा दिल्या. मूहुर्ताचा क्लॅप मोरेश्वर भोईर, शंकर महाराज, गणेश भाने याच्या शुभहस्ते दिला.

लवकरच लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे असे दिग्दर्शक अजय पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जीवन मढवी तर आभार प्रदर्शन अजय यादव यांनी केले.