April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

माय ट्रेन लघुपटाला यश

कल्याण
लेखक, दिग्दर्शक अजय पाटील यांच्या “माय ट्रेन” या लघुपटाला पश्चिम रेल्वेने आयोजित केलेल्या माझे स्थानक माझा अभिमान स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळाला आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील डीआरएम कार्यालयात एका शानदार सोहळ्यात पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांच्या हस्ते लघुपटाचे लेखक दिग्दर्शक अजय पाटील यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
रेल्वे ही राष्ट्राची संपत्ती आहे. तिच्या  स्वच्छतेची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आला होते. शॉर्ट फिल्म बनवा शेअर करा आणि लाईक जितक्या मिळतील त्यानुसार स्पर्धेत क्रमांक ठरवले जातील अश्या स्पर्धेत “माय ट्रेन” हा लघुपट तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला.
माय ट्रेन या लघुपटाची कथा अशी आहे – रेल्वेमधून प्रवास करणारी एक व्यक्ती विंडो सीटला बसून खिडकीतून थुंकते. परंतु ती थुंकी खिडकीला चिकटून राहते. हे दृष्य अत्यंत किसळवाणे दिसले तरी त्या व्यक्तीला त्याच काही वाटतं नाही. आईबरोबर प्रवास करणारी एक विद्यार्थिनी खिडकीजवळ बसण्याचा प्रयत्न करते. परंतु तिची आई मात्र त्या घाणीमुळे तिला बसायला देत नाही. बाजूचा सहप्रवाशीही विंडो सीटला बसायला जात नाही. हे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तीला आपल्या कृतीची लाज वाटते. आणि ती व्यक्ती स्वत:ची थुंकी पाण्याने धुवते. पुसते. आणि आपली चूक सुधारते.
आनंदी झालेली मुलगी विंडो सीटला बसते. थुंकीवाटे रोगराईला आमंत्रण दिले जाते रेल्वेतून प्रवास करतांना हे टाळायला हवं असा अत्यंत सकारात्मक संदेश देत दोन मिनिटांचा लघुपट संपतो. या लघुपटात करणसिंह राजपूत, प्रियांका डांगे, दीपक चिपळूणकर, बाल कलाकार मानसी चौधरी यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. हा लघुपट आता रेल्वेच्या सर्व स्टेशनवर दाखविला जाईल असे डी आर एम व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले. माय ट्रेन या लघुपटाच्या यशाबद्दल लक्ष्मी चित्राच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे .