कल्याण
जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर फक्त स्वप्न बघू नका, प्रयत्न करा असे उदगार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी काढले. कल्याण पूर्व येथील कमलादेवी कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्सच्या पदवीदान समारोहावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आयुक्त डॉ. दांगडे यांनी हे उदगार काढले.
महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्हाला मिळालेले मित्र-मैत्रिणी हा सगळ्यात मोठा-मौल्यवान ठेवा असून जेव्हा केव्हा तुम्ही जीवनामध्ये निराश होतात तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये येऊन मित्र-मैत्रिणींना भेटल्यास तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल असे डॉ. दांगडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधिताना सांगितले. मी स्वतःही देखील जेव्हा परळ येथील पशुवैद्यकीय कॉलेजमध्ये जातो तेव्हा मी परत येताना पुढील आयुष्यासाठी ऊर्जा घेऊन येतो. आपणही आपल्या महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहून ही ऊर्जा जतन करावी असे ते पुढे म्हणाले. त्याचप्रमाणे पदवी नंतर पुढील स्पर्धा परिक्षांसाठी, उच्च शिक्षणासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पदवी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून प्राप्त झालेली पदवी प्रमाणपत्रे डॉ. दांगडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आली.
या महाविद्यालयामध्ये सुमारे ४००० विद्यार्थी शिक्षण घेत असून जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी २०२१-२२ मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशी माहिती कमलादेवी आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे चेअरमन सदानंद तिवारी यांनी यावेळी दिली.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह