उल्हासनगर
विधानसभा, विधान परिषदेचे कामकाज कसे चालते, अधिवेशनात जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने मांडले जातात, त्यावर कशी चर्चा होते याबाबतीत विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी तसेच भविष्यात उत्तम नेतृत्व घडवण्याच्या उद्देशाने नुकतेच राज्यस्तरीय युथ पार्लमेंटचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या युथ पार्लमेंट साठी राज्यातील विविध 12 विद्यापीठातून 78 विद्यार्थ्यांची निवड झालेली होती. यात एसएससी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने चे ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचारे यांच्यासह काही स्वयंसेवकांची निवड करण्यात आलेली होती. त्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
या शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रमोद पाब्रेकर, माजी राज्य संपर्क अधिकारी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ.रामेश्वर कोठावले, राज्य संपर्क अधिकारी रा.से. यो. कक्ष, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, स्वाती महापात्रा, तानाजी पाटील, युनिसेफ महाराष्ट्र, सुशील शिंदे,ओएसडी रा. से. यो. विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या युथ पार्लमेंट मध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री, विविध मंत्री, इत्यादी सर्वांची विद्यार्थ्यांमधूनच निवड करण्यात आली होती.
ज्याप्रकारे महाराष्ट्र शासनाचे हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन भरते त्याचप्रकारचे अधिवेशन भरवण्यात आले. लोकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. या युथ पार्लमेंटचा उद्देश भविष्यामध्ये उत्तम नेता कसे बनता येईल, लोकांचे विविध प्रश्न कसे मांडता यावेत, याबाबतचे प्रत्यक्ष मार्गदर्शन युथ पार्लमेंट भरून देण्यात आले. याशिवाय विधानसभा, विधानपरिषदचे कामकाज कसे चालते याचे प्रत्यक्षात त्या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. राज्यपालांचे कामकाज कसे चालते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर सर्व मंत्री यांचे शपथविधी ज्या भवनामध्ये घेतले जाते ते राजभवन विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच राज्यपालांशी चर्चा करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली.
हॆ राज्यस्तरीय युथ पार्लमेंट सुधीर पुराणिक संचालक राष्ट्रीय सेवा योजना, मुंबई विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली ओएसडी सुशील शिंदे, रमेश देवकर, कार्यक्रम अधिकारी रा. से. यो. विभाग, मुंबई विद्यापीठ, जिल्हा समन्वयक जीवन विचारे, निखिल कारखानीस, क्रांती उके, तसेच विभागीय समन्वयक नीरज मिश्रा,अरुणा गुजर, आदित्य धायफले, कोमल पाटील इत्यादींनी हे दोन दिवशीय राज्यस्तरीय शिबिर यशस्वी केले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह