April 18, 2025

news on web

the news on web in leading news website

आठ वर्षांनी मीराचा कमबॅक

आठ वर्षांनी मीरा जोशीचा ‘कमबॅक’

बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा करणार कोरिओग्राफी

मुंबई

असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम करणारी मीरा जोशी आता आठ वर्षांच्या दीर्घ काळानंतर कोरिओग्राफर म्हणून पुन्हा ‘कमबॅक’ करतेय. सुमन एन्टरटेन्मेंट प्रस्तुत केदार जोशी आणि पूर्वा जोशी यांची निर्मिती असलेल्या ‘पौर्णिमेचा शुभ्र चंद्र’ या गाण्याची मीराने कोरिओग्राफी केली आहे. विशेष म्हणजे, हे गाणे एका रात्रीत कोरिओग्राफ करण्यात आले आहे.

याविषयी मीरा सांगते की, सुनिता मुलकलवार यांनी लिहिलेल्या ‘पौर्णिमेचा शुभ्र चंद्र’ या गीताला अभिजित जोशी यांनी संगीत दिले आहे. तर, सुरेश वाडकर यांनी गायलेले हे गीत दुर्गेश हरवडे यांनी दिग्दर्शित केले आहे. हे गाणे ज्यावेळी पहिल्यांदा ऐकल तेव्हाच या गाण्याने माझ्या मनात घर केले. आणि या गाण्यात आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे या गाण्याशी जोडले जाण्याचा विचार करू लागले. कास्टिंगमध्ये मला या गाण्यासाठी घेण्यात आले नाही. परंतु, त्याचवेळी, या गाण्याची कोरिओग्राफी करशील का अशी विचारणा होताच क्षणाचाही विचार न करता मी लगेचच होकार दिला. असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून तुषार बल्लाळ यांनी काम सांभाळले आहे.

रमेश सिप्पी आणि रोहन सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शिमला मिरची’ या चित्रपटात असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून मी काम केले आहे. या चित्रपटात हेमा मालिनी, रकुल प्रीत, राजकुमार राव, शक्ती कपूर यांना नृत्य शिकविल्याचे मीरा सांगते. त्यानंतर, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटातील प्रियांका चोप्रावर चित्रित झालेल्या ‘अलबेला साजन आयो’ या गीतासाठी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केले आहे.

यापृर्वी मीराने नच बलिये सीजन ७, बुगीवूगी, डान्स इंडिया डान्स यासाख्या रिअलिटी शोमध्ये सुद्धा कोरिओग्राफी केली आहे.