December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

आरआरआर सेंटर्सवर ३ हजार २७७.८९ किलोंचे सामान संकलित

संकलित केलेले साहित्य आदिवासी पाड्यात वितरित करणार

कल्याण

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने १५ मे २०२३ ते ५ जून २०२३ या कालावधीत “मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर” हे अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत १० आरआरआर सेंटर्स १० प्रभागात उभारण्यात आली होती. या सेंटर्समध्ये आजपर्यंत ३ हजार २७७.८९ किलो वजनाचे सुमारे ३ टनापेक्षा जास्त म्हणजे १८३५ नग (सामान) संकलित झाले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज दिली.

महापालिकेने स्थापित केलेल्या आरआरआर सेंटर्संमधील संकलित वस्तु व साहित्य एनजीओमार्फत गरजुंना वाटप करण्याचा कार्यक्रम महापालिकेच्या ब प्रभागात आज आयोजिलेला होता. या कार्यक्रमात बोलताना आयुक्त डॉ. दांगडे यांनी ही माहिती दिली. यावेळी केडीएमसी उपायुक्त धैर्यशील जाधव, अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, उपमुख्य स्वच्छता अधिकारी ए. एल. घुटे, डॉ. रुपिंदर कौर मान्यवर उपस्थित होते.

हे संकलीत झालेले सामान म्हणजे महापालिकेस मिळालेला खूप चांगला प्रतिसाद आहे. यामध्ये वापरण्यायोग्य कपडे, शुज, वह्या-पुस्तके, दफ्तरे, चांगल्या प्रतीच्या साड्या सामान संकलित झाले आहे. त्याचा वापर गरजु लोकांना होवू शकतो, आरआरआर केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता कल्याणला १ आणि डोंबिवलीला १ अशी २ आरआरआर सेंटर्स कायम स्वरुपी सुरु ठेवणार आहोत, जेणेकरुन गरजु लोकांना वापरण्यायोग्य वस्तुंचे संकलन येथे करता येईल अशी माहिती देखील महापालिका आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी दिली. हे संकलित झालेले सामान डॉ. रुपिंदर कौर यांच्या सोलास इंडिया या एनजीओमार्फत आदिवासी भागातील गरजु व गरीब व्यक्तींना वितरित केले जाणार आहे.