December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

भरधाव टेंम्पोची जेसीबीला धडक

कल्याण

भरधाव टेंम्पोची रस्त्यावर उभ्या असलेल्या जेसीबीला जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी कल्याण पश्चिमेत घडली. या अपघातात काही नागरिक थोडक्यात बचावले असून टेम्पोचालक मात्र किरकोळ जखमी झाला आहे.

पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानासमोरील सुभाष नगर येथे आज सकाळी झाडाची भलीमोठी फांदी तुटून रस्त्यावर पडली. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी रस्ता मात्र बंद झाला. या रस्त्यावर पडलेली ही भलीमोठी फांदी जेसीबीमार्फत बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते. परिणामी सुभाष नगरकडून लालचौकीकडे येणारा मार्ग बंद ठेवण्यात आला होता.

दरम्यान ही भलीमोठी फांदी जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने बाजूला केली जात असताना एक टेम्पो त्याच मार्गावरून लालचौकीकडे भरधाव येत होता. आणि जेसीबीचालक आणि त्या शेजारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही समजायच्या आतच या टेम्पोने जेसीबीला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की हा जेसीबी तब्बल दीड ते दोन फूट पुढे ढकलला गेला.

तर या जेसीबीचा मागचा पंजा पुढची काच तोडूनथेट टेम्पोच्या केबिनमध्ये घुसला. ज्यामध्ये हा टेम्पो चालक त्यात अडकून पडला. टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांना मोठे प्रयत्न करावे लागले. टेम्पोचालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचा आरोप यावेळी काही नागरिकांकडून करण्यात आला. दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी टेंपोमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढल्याची माहिती स्थानिक नागरिक महेश पाटील यांनी दिली.