December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण जिल्हा न्यायालयात हिरकणी कक्ष

कल्याण

ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांच्याहस्ते कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश कचरे, वाघमारे, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप, उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, सचिव ॲड.चंद्रकांत वाघमारे, सहसचिव ॲड. सुरेश भगत,  ॲड. सुशील धनगर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा न्यायाधीश यांनी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या  बार रूम मध्ये सदिच्छा भेट दिली. कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप यांनी जिल्हा न्यायाधीश अग्रवाल यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीश अग्रवाल यांच्याबरोबर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील समस्यांचा आढावा घेण्यात आला. दोन जिल्हा न्यायाधीश आणि दोन प्रथम वर्ग न्यायाधीश यांची मागणी करण्यात आली. याबाबतची मागणी उच्च न्यायालयाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पूर्तता केली जाईल असेही ते म्हणाले. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी सरकारी वकील न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पार्किंगच्या प्रश्नाचाही आढावा घेण्यात आला.

महत्त्वाचे म्हणजे कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांचा त्याचबरोबर कल्याण पंचक्रोशीतील पक्षकार, कर्मचारी वर्ग यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कल्याण येथील आहे.  त्याच जागेवर प्रशस्त सुसज्ज असे न्यायालय लवकरच उभारले जाईल असे त्यांनी सांगितले. जिल्हा व सत्र न्यायाधीश कचरे यांची बदली मे महिन्यात होणार आहे. त्यांच्या बदली पूर्वीच न्यायालयाच्या नवीन इमारतीचे आहे त्याच ठिकाणी भूमिपूजन केले जाईल असेही ते म्हणाले. यामुळे कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील वर्गात आनंदाचे वातावरण आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघटनेचे सचिव ॲड. चंद्रकांत वाघमारे यांनी केले. वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.