December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

तर मनसे करणार भीक मागो आंदोलन

केडीएमसी मुख्य उद्यान आधीक्षकांची भेट

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालयाला लागुन असणाऱ्या ऐतिहासिक सुभाष मैदानाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मैदानातील दुरावस्था लवकरात लवकर सुधरविण्यासाठी केडीएमसीचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेत त्यांना मैदानाच्या दुरावस्थेचे फोटो भेट दिले. येत्या १५ दिवसांत येथील परिस्थितीत सुधारणा न झाल्यास मैदानात भीकमांगो आंदोलन करीत मैदानाची डागडुजी करण्याचा इशारा मनसेने दिला.

यावेळी मनसेचे माजी आमदार तथा मनसे शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहर उपाध्यक्ष गणेश चौधरी, मनसे महिला मुरबाड शहापूर जिल्हाध्यक्षा नैना भोईर, शाखा अध्यक्ष संदीप पंडित, गणेश लांडगे, महेश बनकर, रोहन पोवार, अभिजीत मालुंजकर, स्वाती कदम, चेतना रामचंद्रन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण पश्चिमेतील महापालिका मुख्यालयाशेजारीच असलेल्या सुभाष मैदानात अनेक नागरिक दैनंदिन उपक्रमानुसार सकाळच्या सत्रात फेरफटका मारायला येतात. परंतु तेथील फुटपाथवर गाड्यांची रेलचेल सुरु असते. मैदानाची लेवल नसल्यामुळे रोजच्या रोज पाणी मारले जात नसल्याने धुळीने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. तसेच स्वच्छता गृहाची देखील बिकट अवस्था झालेली दिसुन येते. त्याचबरोबर स्त्रियांसाठी चेंजिंग रुमची सोय सुद्धा नाही. येथे असणाऱ्या गटराचे पाणी फुटपाथवर येऊन दुर्गंधी पसरलेली असते. लहान मुलांसाठी खेळण्याकरीता असलेल्या झोपाळ्याची, घसरगुंडी तसेच सी-साँ देखील तुटलेल्या आवस्थेत आहे. बसण्यासाठी बाकडे सुद्धा सुस्थितीत नाहीत. पु.ल. कट्टयाची देखील दयनीय अवस्था आहे.

संध्याकाळच्या वेळीस मैदानात गर्दीमध्ये काहीजण अनाधिकृतरित्या व विनापरवानगी घोडस्वारी करतात. त्यामुळे अपघात होणे टाळु शकता येत नाही. रात्रीच्या वेळीस गर्दूल्ले नशाबाज लोकांचा वावर असतो. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडु शकते. मैदानाची निगा व साफसफाई राखण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे मैदानाची नियमित देखभाल व साफसफाई होत नाही. अवैध पार्किंग व प्रत्यक्ष मैदानात दुचाकी व चार चाकी येण्या-जाण्यावर कुठलेही नियंत्रण नाही. या सर्व गोष्टींमुळे प्रशासनाचे यावर दुर्लक्ष होत आहे.

याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे स्थानिक शाखा प्रमुख संदीप पंडित यांनी आज सकाळी येथे स्वाक्षरी मोहीम देखील घेतली. यानंतर मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी मुख्यालयात मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांची भेट घेत या समस्यांचा पाढा वाचला. या ठिकाणावर योग्य ती कार्यवाही १५ दिवसात न झाल्यास उपोषण व नागरिकांना सोबत घेऊन एक दिवसीय भिक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मनसेने दिला.

केडीएमसीचे मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी मैदानाची अवस्था खराब असल्याचे मान्य करत, मैदानाच्या दुरुस्तीसाठी खेलो इंडिया अंतर्गत याठिकाणी प्रस्ताव दाखल केला असल्याचे सांगितले.