कल्याण
तबला गुरु वि. बी. अलोणी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी साजरा होणारा ‘होरायझन इव्हेंट्स’ आयोजित ‘पेशकार’ हा कार्यक्रम कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात संपन्न झाला. या कार्यक्रमात तबला व हार्मोनियम या दोन वादयांतील आघाडीच्या कलाकारांना ऐकण्याचं भाग्य रसिकांना लाभलं.
सुरवातीला प्रसिद्ध तबला वादक सत्यजित तळवलकर यांचे एकल तबला वादन सादर झाले. सत्यजित यांनी पारंपरिक तीनताल सादर करताना एकल तबलवादनातील सर्व अंगांना स्पर्श केला. पेशकारपासून सुरू झालेली मैफिल कायदे, रेले, तुकडे या सर्व गोष्टींचा आनंद श्रोत्यांना देत पुढे गेली. वादनातील लयकारी, निकास आणि दाया बायाचे संतुलन हे अक्षरक्ष: मंत्रमुग्ध करणारं होतं. सत्यजित यांना सारंगीवर लेहरा साथ उस्ताद साबीरखान यांनी केली.
या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणानंतर ‘तन्मय इन हार्मनी’ हा कार्यक्रम उत्तरार्धात सादर झाला. आपल्या दैनंदिन संगीतातदेखील शास्त्रीय संगीत किती खोलवर रुजलं आहे हे दाखवताना सुरवातीला ‘पिलु मेलडी’ सादर झाली. बहिणाबाईंच्या ओव्या ते ए. आर. रहमान यांच्या सांगीतिक रचनापर्यंत सर्वसमावेशक रचनांचा हा प्रवास होता. ‘पिलु मेलडी’च्या शेवटी तन्मय यांनी स्वरचित एक गत वाजवली. कार्यक्रमाची सांगता ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या अजरामर नाट्यसंगीताने झाली.
संपूर्ण कार्यक्रमात राहुल वाधवानी (कीबोर्ड), आशय कुलकर्णी (तबला), तन्मय पवार (गिटार), अभिषेक भुरुक (ड्रम), आदित्य भारद्वाज (बास) या कसलेल्या कलाकारांनी तन्मय यांना तोलामोलाची साथ दिली. कार्यक्रमानंतर आपल्या भावना व्यक्त करताना पेशकारच्या माध्यमातून अशाच नवनवीन कार्यक्रमांचा आस्वाद संगीत रसिकांना नेहमी मिळत राहील असे होरायझन इव्हेंट्सचे प्रशांत दांडेकर व स्वप्नील भाटे यांनी सांगितले.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह