December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसीचे कोणतीही करवाढ नसलेले अर्थसंकल्प

कल्याण

कोणतीही करदर वाढ नसलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रक्कम रु. 2493.71 कोटी जमा व रक्कम रु. 1847.17 कोटी खर्चाचे सन 2023-24 चे सुधारीत अंदाजपत्रक आणि महापालिकेचे सन 2024-25 चे रक्कम रु.3182.53 कोटी जमा व रक्कम रु.3182.28 कोटी खर्चाचे आणि रक्कम रु. 25 लक्ष शिल्लकेचे मुळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इंदु राणी जाखड़ यांजकडुन सादरीकरण करुन मंजूरी देण्यात आली.

पर्यावरणपूरक, समाजातील सर्व घटकांचा (दिव्यांग, विदयार्थी वर्ग, महिला वर्ग, जेष्ठ नागरीक इ.) हॅप्‍पीनेस इंडेक्स संवर्धित करणा-या सन 2024-25 चे अंदाजपत्रकाचे आज सादरीकरण करण्यात आले.

कोणतीही करदर वाढ नसलेले पर्यावरणपूरक समाजातील सर्व घटकांचे (दिव्यांग, विदयार्थी वर्ग, महिला वर्ग, जेष्ठ नागरीक इ.) हॅपीनेस इंडेक्स संवर्धित करणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रक्कम रु.2493.71 कोटी जमा व रक्कम रु. 1847.17 कोटी खर्चाचे सन 2023-24 चे सुधारीत अंदाजपत्रक आणि महापालिकेचे सन 2024-25 चे रक्कम रु.3182.53 कोटी जमा व रक्कम रु.3182.28 कोटी खर्चाचे आणि रक्कम रु. 25 लक्ष शिल्लकेचे मुळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी आज सादर करुन त्यास मंजूरी दिली.

महिला दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांचे हित लक्षात घेवून सादर केलेल्या आजच्या अंदाजपत्रकात दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत महापालिकेमार्फत दिव्यांगासाठी मासिक पेन्शन व विविध उपक्रम यासाठी सामाजिक भावनेच्या दृष्टीकोनातून रु. 12 कोटीची तरतुद उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच महापालिका शिक्षण विभागांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र सुरु करणे प्रस्तावित आहे. महापालिका परिक्षेत्रातील कार्यरत महिलांकरीता वस्तीगृह उभारणे प्रस्तावित असून, यासाठी रु. 50 लाख तरतुद करण्यात आली आहे. तसेच आरक्षणा अंतर्गत प्राप्त झालेल्या जागांमध्ये यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महापालिका शाळांमध्ये प्रार्थमिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थींनीसाठी NEET, JEE तसेच MPSC, UPSC या स्पर्धा परिक्षांसाठी महिलांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करुन त्याअंतर्गत आर्थिक सहाय्य देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी रु. 1.50 कोटी तरतुद करण्यात आली आहे. महापालिके अंतर्गत शहरातील निराधार/बेघर नागरीकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी 2 निवारा केंद्र टिटवाळा व डोंबिवली येथे कार्यरत असून, त्यासाठी रु. 1 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच 3रे निवारा केंद्र विठ्ठलवाडी येथे प्रस्तावित आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कला, क्रीडा इ. गुणांना वाव देण्याकरीता तज्ञ मार्गदर्शन संस्था नेमण्यात येणार आहेत. महापालिका क्षेत्रातील जेष्ठ नागरीकांकरीता सोयीसुविधांसह 50 सन्मान कट्टे उभारण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी रु. 50 लाख तरतुद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथी नागरीकांसाठी विविध योजना प्रस्तावित असून, यासाठी रु. 50 लाख तरतुद करण्यात आली आहे. मांडा-टिटवाळा आरक्षण क्रमांक 54 या भुखंडावर हरितक्षेत्र विकसित करण्यात येणार असून, त्यामध्ये वयोवृध्द नागरीकांच्या विरंगुळ्यासाठी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी शहरातील लाकडांवर चालणा-या स्मशानभुमीचे टप्प्याटप्प्याने “विद्युत दाहिनीत” रुपांतर करण्यात येणार आहेत. यामुळे वृक्षतोडीला आळा बसून हवेतील प्रदुषण कमी होण्यास मदत होईल. येत्या वर्षात मृत प्राणीमात्रांच्या अंत्यविधीसाठी विद्युत दाहिनी उभारणे व त्याच्या आजुबाजूच्या परिसरात “मियावाकी” पध्दतीने हरीतक्षेत्र उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.

बारावे येथे आरक्षण क्रमांक 152 या भुखंडावर सुसज्य बगीचा विकसित करण्यात येणार असून, या उद्यानात “ऑटीझम व्हीलेज” ही अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील ऑटीझम ग्रस्त मुलांना सर्व प्रकारच्या सुविधांसह सुसज्य असे उद्यान उपलब्ध होईल. तसेच किड-झी या ठिकाणी अद्यावत सुविधांसह तयार होणार आहेत. शहरात अनेक ठिकाणी मियावाकी पध्दतीने हरित क्षेात वाढ करण्यात येणार आहे.

शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत महापालिकेस प्राप्त झालेल्या पुरस्काराच्या रक्कमेमधून महापालिकेचे 5 उद्याने, प्रमुख इमारती, रुग्णालये इ. ठिकाणी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच जीव्हीपी पॉईंट बंद करण्याचे दृष्टीने देखील सुशोभिकरण करण्यात येणार आहे. डोंबिवली पूर्व 90 फुट रस्त्यालगत व कल्याण पश्चिम वसंत व्हॅली परिसरात मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ तसेच गोलवली येथे सुसज्य उद्यान विकसित करण्यात येणार आहे. बारावे येथे आरक्षण क्रमांक 147 या भुखंडावर खेळाचे मैदान विकसित करण्यात येणार असून त्यामुळे खेळाडुंना सुसज्य मैदान उपलब्ध होईल. तसेच केंद्र शासनाच्या “खेलो इंडिया” योजनेंतर्गत सुभाष मैदान येथे बहुउद्देशिय इंनडोअर गेम हॉल उभारण्यात येणार असून, मैदानाचे कायापालट करण्यात येणार आहे.

डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील आरक्षण क्रमांक 37 या भुखंडावर 2000 चौ.मी. क्षेत्रफळावर बास्केटबॉल, खो-खो, टेनिस कोर्ट, कब्बडी इ. खेळांसाठी क्रीडासंकुल विकसित होणार आहे. महापालिका मुख्यालय, गीता हरकिसनदास रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे स्मारक, गौरीपाडा लॅब, वसंत व्हॅली रुग्णालय शिक्षण मंडळ कार्यालय, अन्सारी रुग्णालय इ. ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचे उद्दीष्ट असून त्यातून 286 कि.वॅट वीजनिर्मिती होणार आहे. नविन इमारतींवर विकासकांकडून 4 मे.वॅट क्षमतेची सौरऊर्जा संयत्रे उभारण्याचा मानस आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत कल्याण पश्चिमेतील उंबर्डे तलाव व डोंबिवलीतील निळजे येथील माऊली तलाव यांचे संवर्धन व पुर्नजिवन करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, आगामी वर्षात हे तलाव नागरीकांसाठी खुले होतील.

अंदाजपत्रकातील इतर तरतुदींची ठळक वैशिष्टये…

१) तलाव सुशोभिकरण व संवर्धन – रु. 41 कोटी.

२) स्मशानभुमी व अंत्यविधी स्थाने – महसुली रु. 5 कोटी व भांडवली रु. 2.50 कोटी.

३) नाट्यगृहे (रंगमंदिर)/क्रीडा केंद्राची व्यवस्था – रु. 9 कोटी.

४) उड्डाणपुल – रु. 30.00 कोटी.

५) विद्युत व्यवस्था – महसुली रु. 35 कोटी व भांडवली रु. 14 कोटी.

६) अग्निशमन – महसुली रु. 9 कोटी व भांडवली रु. 20 कोटी.

७) मुलभूत सोयी सुविधा, एमएमआरडीए, खासदार-आमदार निधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना इ. – शासन अनुदानातंर्गत विविध कामे करण्यात येणार असून, त्यापोटी रक्कम रु. 445 कोटी तरतुद करण्यात आली आहे.

८) रुणालये व दवाखाने – महसुली रु. 29.05 कोटी.

९) सार्वजनिक स्वच्छता व‍ घनकचरा व्यवस्थापन – महसुली रु. 147 कोटी व भांडवली रु. 80.50 कोटी.

१०) प्राथमिक शिक्षण – महसुली रु. 81 कोटी व भांडवली रु. 1.50 कोटी.

११) दुर्बल घटक, शहरी गरीब – रु. 15 कोटी महसूली व रु. 34 कोटी भांडवली.

१२) महिला व बाल कल्याण कार्यक्रम – रु. 12.11 कोटी.

१३) दिव्यांग कल्याण व पुर्नवसन कार्यक्रम – रु. 12.25 कोटी.

१४) क्रीडा व सांस्कृतीक – रु. 2 कोटी. परिवहन व्यवस्था – रु. 66 कोटी.

१५) पाणी पुरवठा – महसुली रु. 154.30 कोटी व भांडवली रु. 461.40 कोटी.

१६) जलनि:सारण व्यवस्था – महसुली रु. 2.50 कोटी व भांडवली रु. 5 कोटी.

१७) मलनि:सारण व्यवस्था – महसुली रु. 37.10 कोटी व भांडवली रु. 45 कोटी.