December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा संपन्न

ठाणे

जिल्हा परिषद ठाणे मार्फत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील “विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री” आयोजित करण्यात आले आहे. स्वयं सहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व खादयपदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता विभागीय सरस प्रदर्शन व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री ०१ ते ०३ मार्च दरम्यान धर्मवीर आनंद चिंतामणी टॉवर मैदान, ठाणे येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे आज, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

यावेळी उमेदची घोडदौड सुरू आहे आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी यांनी खुप सुंदर पद्धतीने नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून महिला आल्या आहेत, त्याच विषय कौतुक. संसार सांभाळून तुम्ही स्वावलंबी होण्यासाठी जिद्दीने पुढाकार घेऊन महिला बघीनी आयुष्यातली विविध समस्या सोडवत असतात. महिलांनी आरोग्य सांभाळण्यासाठी चालणे व पौष्टिक आहार सेवन करणे, कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करु नये तसेच आर्थिक स्वावलंबन यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करत आहात ही आनंदाची बाब आहे. सर्व महिला बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तुची जास्तीत जास्त विक्री व्हावी अशा शुभेच्छा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी दिल्या.

महिला ही देवी किंवा देव म्हणुन पुजली जाते, असं आपण म्हणतो पण त्याच सोबत तिच सक्षमीकरण करण्यासाठी महिला बचतगटांद्वारे रोजगार मिळवून आर्थिक उत्पन्नात वाढ होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आज शासनाच्या विविध योजनांचा बचत गटांना फायदा होत आहे. महिला बचतगटांसाठी दुग्ध व्यवसाय व किचन कॅफे सुरू करणार आहोत, तसेच प्रायोगिक तत्त्वावर शहरात महिला बचतगटांना स्टॉल लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी महिलांना संबोधित केले.

आज आम्ही उमेदमुळे झिरो टू हिरो झालो. आम्हाला व्यवसाय करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद ठाणेचे खूप आभार.

– निशा ठोमरे, महिला बचत गट लाभार्थी

उमेदद्वारे आम्हाला आर्थिक नियोजनाचे धडे दिले गेले. उमेदमुळे आज आत्मविश्वासाने मी व्यवसाय करतेय. त्यासाठी मी उमेद आणि त्यासाठी काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानते.

– चारुशीला गायकर, महिला बचत गट लाभार्थी  

सदर प्रदर्शनामध्ये अंदाजित मिनी सरस ५० स्टॉल, जिल्हा सरस २५ स्टॉल उभारणी करण्यात आले आहे. खाद्य पदार्थ, मसाले, हळद, इंद्रायणी तांदूळ, ग्रामीण कलाकसुरीच्या विविध वस्तू, नागलीच्या कुकीज, नागली प्रिमिक्स, कडधान्य, डाळी, शाकाहारी, मांसाहारी मेजवानी व इतर विविध वस्तु विक्रीसाठी व प्रदर्शनासाठी उपलब्ध आहे.