December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

नवी मुंबई आणि कल्याणच्या मध्यभागी विकसित होणार तिसरी मुंबई

कल्याण तळोजा मेट्रो १२ मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन

कल्याण

केवळ कल्याण डोंबिवली शहरांसाठीच नव्हे तर संपूर्ण एमएमआर रिजनचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षी कल्याण तळोजा मेट्रो 12 प्रकल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कल्याण शीळ मार्गावरील प्रीमियर कंपनीच्या मैदानावर झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमामध्ये या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्ह्यातील सर्व आमदार, महापालिका आयुक्त यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हा गेम चेंजर कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असून या प्रकल्पासाठी तब्बल 5 हजार 865 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाकडे पाहिले जाते. या मार्गाच्या उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला. या मार्गाच्या आणि यातील स्थानकांच्या प्रत्यक्ष बांधकामांच्या निविदा एमएमआरडीए प्रशासनाने काही आठवडयांपूर्वीच जाहीर केल्या आहेत.

मेट्रो 12 मध्ये असणार १९ उन्नत स्थानके

या 12 मेट्रो प्रकल्पामध्ये कल्याण ते तळोजा दरम्यान १९ उन्नत स्थानके असणार असून या स्थानकांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएकडून १ हजार ५२१ कोटींची निविदाही जाहीर करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचे भूमीपूजन झाल्यानंतर त्याच्या कामाला आणखीनच गती प्राप्त होणार आहे. आगामी ३० महिन्यात हे मेट्रोचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यानंतर ही मेट्रो लाखो लोकांच्या सेवेत दाखल होईल.

२० किलोमीटर लांबीचा हा मार्ग

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यामाध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे ठाणेपल्याड राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईसह ठाणे आणि ठाणेपल्याड कल्याण- डोंबिवली या शहरांसाठीही मेट्रो मार्गाची उभारणी केली जाते आहे. याअंतर्गत ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील काही गावे तसेच पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. एकूण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यात १९ स्थानके आहेत.

ग्रामीण भाग जोडला जाणार नवी मुंबईशी

या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुंबई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे. यामुळे आता लवकरच या मार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

या स्थानकांचा असणार समावेश

कल्याण तळोजा (मेट्रो १२) अंतर्गत कल्याण,  कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसवली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली(खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या स्थानकांचा समावेश असणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, रेल्वे, रोडची विकासकामे सुरू आहेत. कल्याण तळोजा मेट्रोमुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग नवी मुंबईशी जोडला जाणार आहे. तसेच, नवी मुंबई आणि कल्याण दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे की, येत्या काळात इकडे तिसरी मुंबई निर्माण होईल. तसेच नवी मुंबईपासून कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि वांगणी येथून राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा एक्सेस कंट्रोल मार्गही येत्या काळात इकडे विकसित केला जाणार आहे.

डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा मतदारसंघ