December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

विद्यापीठाच्या उपकेंद्रात शिकतात फक्त ११ विद्यार्थी

विद्यापीठ उपकेंद्र आहे कि, निवडणूक कार्यालय

मनसेचा सवाल

कल्याण

मुंबई विद्यापीठाच्या कल्याणमधील उपकेंद्रात केवळ ११ विद्यार्थीच शिकत असून याठिकाणी पूर्ण क्षमतेने अभ्यासक्रम सुरू करावा अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या या उपकेंद्राला टाळे ठोकू असा इशारा कल्याणच्या मनसेने दिला आहे. हे विद्यापीठ उपकेंद्र आहे कि, निवडणूक कार्यालय असा सवाल देखील यावेळी मनसेने केला आहे. मनसेचे माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने या उपकेंद्राला भेट देत उपकेंद्राचा आढावा घेतला.

उच्च शिक्षणासाठी कल्याणसह आसपासच्या शहरातील विद्यार्थ्यांना मुंबईतील विद्यापीठ गाठावे लागते. यासाठी तत्कालीन मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी मोठा संघर्ष करून कल्याणमध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर करून घेतले. पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात भव्य स्वरूपात या उपकेंद्रांची इमारत उभारण्यात आली असून याठिकाणी काही अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आले आहेत. मात्र हे अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू नसून या अभ्यासक्रमांची माहितीच विद्यार्थ्याना होत नसल्याने केवळ ११ विद्यार्थीच याठिकाणी शिक्षण घेत आहेत.

तर याठिकाणी नेहमीच निवडणूक विभाग निवडणुकीच्या वेळी आपले कार्यालय थाटत असल्याने हे विद्यापीठ उपकेंद्र आहे कि, निवडणूक कार्यालय असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. गणेशोत्सव काळात कृत्रिम तलाव देखील उभारत गणेश विसर्जन केले जाते. त्यामुळे या उपकेंद्रात शिक्षणाऐवजी इतर सर्व घडामोडी घडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. सध्या याठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने केवळ मनसेने निवेदन देत याठिकाणी सर्व अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली.

यावेळी, मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, मुरबाड शहापूर विधानसभा जिल्हाध्यक्षा नयना भोईर, मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विनोद केणे, महिला शहर अध्यक्षा कस्तूरी देसाई, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, राजन शितोळे, सचिन शिंदे, रोहन पोवार, सुनील घेगडे, कपिल पवार, महेश बनकर, गणेश लांडगे, संदीप पंडित, अभिजीत मालुंजकर, विराज चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हे उपकेंद्र सुरू होऊन ५ वर्षे झाली असून फक्त ११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ठाण्यातील उपकेंद्रात तब्बल ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या उपकेंद्रांची कुठलीही जाहिरात नसून केवळ निवडणूक कार्यालय आणि अधिकाऱ्यांना बसण्याचे ठिकाण म्हणून याचा वापर होत आहे. कल्याणच्या आसपास शेकडो खेडी असून येथील विद्यार्थ्याना याचा उपयोग व्हायला हवा. जर कल्याणमधील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होत नसेल तर कल्याणकरांनी उपकेंद्राला दिलेली जागा परत घेण्याची वेळ आली आहे.

हे उपकेंद्र सुरू होऊन ५ वर्षे झाली असून फक्त ११ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ठाण्यातील उपकेंद्रात तब्बल ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. य उपकेंद्रांची कुठलीही जाहिरात नसून केवळ निवडणूक कार्यालय आणि अधिकाऱ्यांना बसण्याचे ठिकाण म्हणून याचा वापर होत आहे. कल्याणच्या आसपास शेकडो खेडी असून येथील विद्यार्थ्याना याचा उपयोग व्हायला हवा. जर कल्याण मधील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होत नसेल तर कल्याणकरांनी उपकेंद्राला दिलेली जागा परत घेण्याची वेळ आली आहे.

माजी आमदार प्रकाश भोईर