कल्याण
आज रोजी पहाटे ४.५५ वाजता बारावे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे साठलेल्या सुक्या कचऱ्यास अचानकपणे आग लागल्याचे निदर्शनास आले. सदर ठिकाणी रात्रपाळीवर कार्यरत असलेल्या कामगारांनी लगतच असलेल्या बारावे मलनि:सारण प्रकल्पातून उपलब्ध पाण्याने आग विझविण्याचे काम सुरू केले आणि आधारवाडी अग्निशमन केंद्राशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. आगीचे वृत्त कळताच महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी घटनास्थळास भेट देऊन आग नियंत्रणात आणण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.
आधारवाडी अग्निशमन केंद्रावरून तातडीने ६ फायर टेंडर गाड्या व ८ पाण्याचे टँकर प्रत्यक्ष जागेवर पोहोचले व लगेच आग विझवण्याचे कार्यवाही सुरू करण्यात आली. या प्रकल्पामध्ये दैनंदिन १०० मॅट्रिक टन प्रतिदिन सुका कचरा येत होता व त्याचे वर्गीकरण करून तो अन्य उत्पादक कंपन्यांकडे पाठविण्यात येत होता. यामध्ये बहुतांश आरडीएफ मटेरियल हे सिमेंट उत्पादकांच्या मागणीनुसार पाठविण्यात येते. असा सुमारे १५०० मॅट्रिक टन कचरा येथे साठला होता. हा कचरा अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीवर त्वरित नियंत्रण करणे आवश्यक होते, त्यामुळे ६ फायर टेंडर व ८ पाण्याचे टँकर्स वापरून आगीवर नियंत्रण करण्यात येत आहे.
महापालिका शहर अभियंता अनिता परदेशी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील व मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या निर्देशानुसार वेगवेगळी पथके तयार करून सुरू असलेल्या आगीवर नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे. या आगीमध्ये प्रीसॉट युनिट, श्रेडर युनिट व शेडच्या छताचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह