December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

Photo courtesy: Department of Public Health

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे. उष्णता, अति उष्णता, उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

सामान्य मानवी शरीराचे तापमान 36.4°C ते 37.2°C (97.5°F ते 98.9°F) दरम्यान असते.

 उष्णतेचा आरोग्यावर परिणाम

सामान्य लक्षणे

सामान्यतः उष्णतेशी संबंधित (सौम्य ते गंभीर) आजारांमध्ये अंगावर पुरळ (अंगाला टोचणारी उष्णता), सूज (उष्णतेमुळे हात, पाय आणि घोट्याला सूज येणे), पेटके (उष्णतेमुळे स्नायूंमध्ये पेटके), उष्माघात, गोंधळल्यासारखे वागणे, काहीही न सुचणे, उष्णतेमुळे थकवा यांचा समावेश होतो. उष्णतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, श्वसन, किडनी रोगांसारख्या जुनाट आजारांवरील ताण देखील वाढू शकतो.

अति उष्णतेमुळे शरीरावर परिणाम करणारी लक्षणे

चक्कर येणे किंवा मूर्च्छा येणे, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या, अति तहान लागणे, अतिशय गडद पिवळ्या लघवीसह लघवीचे प्रमाण कमी होणे, जलद श्वासोच्छवास आणि हृदयाचे वाढलेले ठोके

उष्माघाताची लक्षणे

डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे यासह प्रौढ व्यक्तिंमध्ये दिशाभूल, गोंधळासह बदललेली मानसिक संवेदना आणि चिडचिड, अॅटॅक्सिया, फेफरे किंवा कोमामध्ये जाणे, गरम, लाल आणि कोरडी त्वचा, शरीराचे तापमान 40°C किंवा 104°F, धडधडणारी डोकेदुखी ही उष्माघाताची लक्षणे आढळतात. तर मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, अति चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे, शुष्क त्वचा आणि अश्रू न येणे / खोल गेलेले डोळे, सुस्ती/बदललेल्या संवेदना, चिंता, चक्कर येणे, मूर्च्छा येणे आणि डोके हलके होणे, जखडणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव, स्रायू कमकुवत होणे किंवा पेटके येणे, मळमळ आणि उलटी, जलद हृदयाचे ठोके / श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे आढळतात.

उपाय

उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करत असताना या गोष्टींचा अवलंब करावा

संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास ही काळजी घ्या –

व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवावे. व्यक्तीचे कपडे सैल करावेत. त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजावे. तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे आणि वैद्यकीय सल्ला घ्या.

उष्माघाताचा त्रास झाल्यास करावयाचे प्रथमोपचार –

त्रास झालेल्या मुलाला/मुलीला लगेच घरात/सावलीत आणावे. संवेदनशील राहून त्यांचे कपडे सैल/ढिले करावेत. नळाच्या पाण्याने ओल्या केलेल्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात. उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे, जेणेकरून ते गुदमरून जाणार नाहीत. हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा. पायांखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून त्यांना आडवे पडायला सांगावे. मूल जागे असल्यास वारंवार साफ आणि थंड पाण्याचे घोट पाजावेत. मूल बेशुद्ध असल्यास त्यांना खायला / प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नये.

उष्माघातापासून बचाव –

काय करावे ? – 

अतिउष्णतेच्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. त्यासाठी तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे. तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

भरपूर ताजे व हलके अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.

पातळ, सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हात बाहेर जाताना डोके झाकावे. टोपी/कपडा/छत्रीचा वापर करावा. भरपूर पाणी, ओ. आर. एस. पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे. थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर, इतर स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारख्या उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात. सूर्यप्रकाशात उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावी.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) वेबसाइट https://mausam.imd.gov.in/ वर हवामानाची अद्ययावत माहिती मिळवावी. शक्य तितके चांगल्या हवेशीर आणि थंड ठिकाणी, घरामध्ये, सावलीत राहावे. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटांना अडथळा निर्माण करावा. शक्यतो तुमच्या घराच्या ऊन येणाऱ्या बाजूच्या खिडक्या आणि पडदे दिवसा बंद ठेवा, रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडाव्यात. घराबाहेर जात असल्यास, तुमची बाहेरील कामे दिवसाच्या थंड वेळेपर्यंत म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी मर्यादित करा. दिवसाच्या थंड वेळेमध्ये बाहेरच्या कामांचे वेळापत्रक किंवा नियोजन करावे.

उष्णतेचा त्रास आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा अति धोका असतो, अशा जोखमीच्या लोकांकडे अतिरीक्त लक्ष दिले पाहिजे. यामध्ये लहान मुले आणि बालके, घराबाहेर काम करणारे लोक, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब, गर्भवती महिला, ज्या लोकांना मानसिक आजार आहे अशा व्यक्तिंचा समावेश होतो.

थंड हवामानापासून उष्ण हवामानापर्यंतच्या भागात प्रवास करणाऱ्यांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा. उष्ण वातावरणात एक्सपोजर/शारीरिक क्रिया हळूहळू वाढल्याने (10-15 दिवसांपेक्षा जास्त) अनुकूलता प्राप्त होते.

काय करू नये?

रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नये. उन्हात अधिक वेळ राहू नये. तिखट मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नये. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. ताप आल्यास थंड पाण्याची पट्टी ठेवावी. कूलर किंवा एअर कंडिशनर्समधून थेट उन्हात बाहेर पडू नये.

उन्हात विशेषतः दुपारी 12:00 ते 03:00 दरम्यान बाहेर पडणे टाळावे. दुपारच्या वेळी बाहेर पडताना अति परिश्रमाची कामे टाळावीत. अनवाणी बाहेर जाऊ नये. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेली पेये टाळावीत, कारण यामुळे शरीरातील द्रवपदार्थ जास्त प्रमाणात कमी होतात किंवा पोटात पेटके येऊ शकतात. पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नये. वाहनातील तापमान धोकादायक ठरु शकते.

शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेले आदि व्यक्ती आपल्या नजरेस आल्यास 108/102 या क्रमांकावर संपर्क साधावा.

स्त्रोत –

सार्वजनिक आरोग्य विभाग,