December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला

मुंबई

सध्या इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यामधून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. टेलिमानस या सेवेकरिता टोल फ्री क्रमांक 14416 (भ्रमणध्वनीसाठी) आणि 18008914416 (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या सेवेचा गरजू विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, सायक्याट्रिक नर्स आणि सायक्याट्रिक सोशल वर्कर समुपदेशनाचे कार्य करीत असून या सेवेसाठी मनोविकृतीतज्ज्ञदेखील नियुक्त आहेत. राज्यात आजपर्यंत 70 हजार व्यक्तींनी समुपदेशनाचा लाभ घेतला आहे. यामध्ये नैराश्य, ताणतणाव, निद्रानाश, दु:खी मन:स्थिती, पौगंडावस्थेतील मानसिक स्थित्यंतरे आदी समस्यांचे निराकारण केले जाते. राज्याच्या टेलिमानस कार्यक्रमाच्या उपयोगीतेमध्ये देशात दुसरा क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आयुक्त, आरोग्य सेवा यांनी कळविले आहे.