प्रकल्प अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन देण्यात आला मोबदल्याचा धनादेश
शहापूर
मुंबई आणि आसपासच्या एम एम आर रिजनला अखंड वीज पुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाने आता चांगलाच वेग घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत संबंधित शेतकरी आणि जमीन मालकांना मोठा मोबदला मिळत असल्याने जमीन मालक स्वतःहून पुढे येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहापूर तालुक्यातील सुरेश तुकाराम राऊत या जमीन मालकाला घसघशीत मोबदला प्राप्त झाला आहे. शहापूर तालुक्यातील जंगल परिसरात सुरेश राऊत यांच्या मालकीची जमीन होती. जिच्या मोबदला मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनीही विशेष प्रयत्न केले आणि सुरेश राऊत यांना हा मोबदला मिळवून दिला.
ट्रान्समिशन नेटवर्कलाही बळ देण्याचे काम…
गेल्या दशकभरात मुंबईसोबतच त्याच्या आसपासच्या महानगर परिसरामध्ये (MMR Region) पायाभूत सुविधांचा अत्यंत वेगाने विकास होतोय. परिणामी या भागामध्ये औद्योगिक आणि रहिवासी अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड अशी वाढ झाल्याने विजेची मोठी मागणी पाहायला मिळत आहे. वाढता वीज वापर लक्षात घेता अशावेळी याठिकाणी अखंडित वीज उपलब्ध असणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखूनच केंद्र सरकारने ऊर्जा मंत्रालयातर्फे मुंबई ऊर्जा मार्ग हा आंतरराज्य महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या माध्यमातून अखंड वीज पुरवठ्यासाठी एक आंतरराज्य ट्रान्समिशन नेटवर्कची (ISTS) उभारणी केली जात आहे. ज्यामुळे मुंबई आणि एमएमआर रिजनसाठी तब्बल २ हजार मेगावॉट अतिरिक्त वीज पुरवठा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासोबतच या भागासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या वीज पुरवठ्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कलाही बळ देण्याचे काम या महत्वाकांक्षी प्रकल्पातून केले जाणार आहे.
सातबाऱ्यावर संबंधित जमीन मालकाच्याच नावे राहणार…
मुंबईसह आसपासच्या एमएमआर परिसराला अखंड वीज पुरवठ्यासाठी केंद्र सरकारतर्फे मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. हा प्रकल्प राबवताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या दरांमध्येही राज्य सरकारने पूर्वीच्या दरापेक्षा घसघशीत वाढ केली आहे. तर प्रकल्पाचे काम करताना किंवा काम पूर्ण झाल्यानंतरही सातबाऱ्यावर संबंधित जमीन मालकाच्याच नावे ही जमीन राहणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या ट्रान्समिशन लाईनसाठी टॉवर उभारले जात आहेत. केवळ टॉवरच्याच नव्हे तर वीज वाहिनी ज्या जमिनीवरून जाईल त्याचाही घसघशीत मोबदला दिला जात आहे. तर प्रकल्पाच्या कामासाठी सरकार कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करत नसून संबंधित जागेच्या सात बाऱ्यावर मूळ मालकाचेच नाव राहत आहे. ही देखील या प्रकल्पाची आणखी एक जमेची बाजू आहे.
आपल्याला दिलेला शब्द शंभर टक्के पाळला : सुरेश राऊत
याच प्रकल्पाअंतर्गत शहापूर तालुक्यातील जंगल परिसरात सुरेश तुकाराम राऊत यांची जमीन होती. त्यावर आवश्यक ती शासकीय कार्यवाही करून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यासह मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांनी राऊत कुटुंबियांना हा मोबदला मिळवून देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले. ज्याद्वारे राऊत यांना मंजूर झालेल्या मोबदल्याच्या रकमेचा धनादेश मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचे अधिकारी सुरजित नारायणन यांच्या हस्ते राऊत कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. त्याबद्दल संपूर्ण राऊत कुटुंबीयांनी जोरदार आनंद व्यक्त करण्यासह मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प आणि सरकारचे आभार मानले. तसेच मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोबदल्याबाबत आपल्याला दिलेला शब्द शंभर टक्के पाळल्याची भावना सुरेश राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.
लाभार्थ्यांना लवकरात लवकर मोबदला मिळणे तितकेच महत्त्वाचे : सुरजित नारायणन
तर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ज्याप्रकारे लोकांचे सहकार्य लाभत आहे ते पाहता हा शासनाचा नव्हे तर लोकांचा प्रकल्प झाला आहे. ठरवून दिलेल्या कार्यकाळात हा प्रकल्प बनणे जितके आवश्यक आहे तितकेच लवकरात लवकर संबंधित जागा मालकांना, शेतकऱ्यांना त्याचा मोबदला प्राप्त होणे हे देखील आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाच्या सुरजित नारायणन या अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
कुणबी, मराठा समाजातील युवती व महिलांसाठी मोफत प्रशिक्षण