केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़
कल्याण
शहरातील अनधिकृत बार, ढाबे, गुटखा पार्लर यांच्यावर नि:पक्षपातीपणे धडक कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी आज दिले. या विषयाबाबत परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महापालिका विभागीय उपआयुक्त, कल्याण व डोंबिवलीतील सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी, महापालिकेच्या सर्व प्रभागाचे सहा. आयुक्त व इतर अधिकारी वर्ग यांचे समवेत आज संपन्न झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी हे निर्देश दिले.
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बार, गुटखा पार्लर, ढाबे, टप-या व इतर ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केली जाते, अशा ठिकाणी त्वरीत कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भात महापालिकेच्या प्रभागातील सहा. आयुक्तांनी यापूर्वीच नोटीसा बजाविल्या असून पुढील कार्यवाही आता सुरु करण्यांत आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ज्या अनधिकृत बार व तत्सम ठिकाणी पोलीस विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. त्याची यादी त्यांनी महापालिकेस दिली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील आठवड्याभरात तीव्रगतीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली आहे.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह