शिवसेनेच्या उंबर्डे – कोळीवली विभागीय शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कल्याण
दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरची पहिली पायरी असून पुढील वाटचालीसाठी पालकांनी आपल्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले. शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 उंबर्डे कोळीवली विभागीय शाखेतर्फे सेंट लॉरेन्स शाळेमध्ये आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
आपला पाल्य जीवनात पुढे जावा यासाठी त्याचे शिक्षक, आई वडील मेहनत घेतात. आताची पिढी ही पूर्वीच्या पिढीपेक्षा अधिक हुशार असून त्यांच्यामध्ये चांगला आत्मविश्वास आपल्याला जाणवतो. शिक्षणाची पध्दत बदललेली असली तरी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ताही वाढली असल्याचे आमदार भोईर यावेळी म्हणाले.
शिवसेनेच्या उंबर्डे कोळीवली शाखेतर्फे गेल्या 30 वर्षांपासून म्हणजेच 1994 पासून हा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येत आहे. जोपर्यंत ही शाखा सुरू आहे तोपर्यंत हा सामाजिक उपक्रम आम्ही सुरूच ठेवणार असल्याचा ठाम विश्वास आमदार भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान यावेळी दहावी आणि बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच त्यातही 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताचे घड्याळ आणि स्कूल बॅग बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आली. तसेच पुढील काळात शिक्षणासंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास बिनदिक्कतपणे आमच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी आयोजकांकडून करण्यात आले.
या गुणगौरव सोहळ्याला शिवसेना उपनेत्या विजया पोटे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील, सेंट लॉरेन्स शाळेचे जॉन पॉल सर, ज्येष्ठ लोकप्रतिनिधी जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, दिव्यांग बांधवांच्या संघटनेचे अशोक भोईर, केडीएमसी परिवहन समितीचे माजी सभापती मनोज चौधरी, नगरसेविका वैशाली भोईर, पुष्पा भोईर यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह