December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

वाहतूक पोलिसांचा शिवसेनेकडून सत्कार

महिलेचा जीव वाचवणाऱ्या वाहतूक पोलिसांचा शिवसेनेकडून सत्कार

कल्याणच्या गांधारी गणेशघाट परिसरात घडली होती घटना

कल्याण

निर्माल्य टाकण्याच्या निमित्ताने गांधारी नदीकिनारी गेलेल्या आणि नंतर नदीमध्ये वाहून जाणाऱ्या महिलेचा जीव दोघा वाहतूक पोलिसांनी वाचवल्याची घटना काल घडली होती. महिलेचा जीव वाचवणाऱ्या कल्याण शहर वाहतूक शाखेचे पोलिस मच्छिंद्र चव्हाण आणि ट्रॅफिक वॉर्डन संजय जैस्वार यांचा कल्याण शहर शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पश्चिमेतील गांधारी परिसरात काल दुपारी हा प्रकार घडला. गांधारीजवळील एका मोठ्या गृहनिर्माण सोसायटीत राहणारी वयोवृध्द महिला गांधारी नदी परिसरातील गणेश घाटाजवळ निर्माल्य टाकण्यासाठी आली होती. मात्र, काही वेळाने ही महिला याठिकाणी दिसत नसल्याचे एका नागरिकाला आढळले. मुसळधार पावसामुळे गांधारी नदीचे पात्रही गणेश घाट सोडून पुढपर्यंत आले होते. त्यामुळे या नागरिकाने त्वरित त्याठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिस चौकीत जाऊन मच्छिंद्र चव्हाण यांना ही माहिती दिली.

मच्छिंद्र चव्हाण आणि वॉर्डन जैस्वार यांनी गणेश घाट किनाऱ्याच्या दिशेने धाव घेत महिलेच्या शोधासाठी पाण्यामध्ये उतरले. त्यावेळी हाताने पाण्यात चाचपत असताना चव्हाण यांच्या हाताला या महिलेची साडी लागली. ती पकडुन त्यांनी खेचण्याचा प्रयत्न केला असता महिलेचा हात त्यांच्या हाताला लागला. तो पकडुन दोघांनीही महिलेला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु ती नदीच्या गाळामध्ये रुतल्याने संपूर्ण ताकदीनिशी दोघांनीही तिला पाण्याबाहेर काढले. आणि क्षणाचाही विलंब न करत तिला जवळील रूग्णालयात दाखल केल्याने या वयोवृध्द महिलेचा जीव वाचू शकला.

वाहतूक पोलीस मच्छिंद्र चव्हाण आणि वॉर्डन जैस्वार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे या महिलेचा जीव वाचू शकला. त्याबद्दल शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील, उपनेत्या विजया पोटे, केडीएमसीचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ, माजी नगरसेवक अरविंद पोटे आदी पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही पोलिसांची भेट घेत सन्मान केला.