शिवसेना आमदार आणि शहर प्रमुखांनी केले पाटील कुटुंबीयांचे सांत्वन
टिटवाळा
शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीमधील टिटवाळ्याच्या तिघा साईभक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या कुटुंबियांची शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी भेट घेत सांत्वन केले. तसेच जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण शिवसेना या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची भावना या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली आहे.
टिटवाळा येथून शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीतील भावेश पाटील, रविंद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर या तिघा साई भक्तांना भरधाव गाडीची धडक बसली होती. घोटी – सिन्नर येथे झालेल्या या अपघातात या तिघांना आपला जीव गमावावा लागला. यातील रविंद्र आणि भावेश हे चुलतभाऊ असून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या रविंद्रचा संसार उघड्यावर आला आहे. याबाबत माहिती समजताच शिवसेनेचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी आज या तिन्ही कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
यावेळी इतकी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी संबंधित गाडी चालकाला अद्याप कोणतीही कारवाई न केल्याची माहिती पाटील कुटुंबीयांनी आमदार विश्वनाथ भोईर आणि शहरप्रमुख रवी पाटील यांना दिली. तसेच याप्रकरणी आम्हाला न्याय मिळवून देण्याचे साकडेही या दोन्ही कुटुंबीयांनी यावेळी घातले.
त्यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की शिवसेना संपूर्णपणे या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असून त्यांचा संसार उघड्यावर येऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला निश्चितच न्याय दिला जाईल असेही आमदार भोईर यांनी स्पष्ट केले.
तर या अपघातात त्यांची तरुण मुलांचे निधन झाले असून पाटील कुटुंबीयांचे हे दुःख खूप मोठे आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य गाडी चालकाऐवजी वेगळ्याच व्यक्तीला अटक केली आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार आहोत. तसेच त्यांच्या लहान मुलांच्या पुढील शिक्षणाचा खर्च तसेच पुढील जबाबदारी शिवसेना कल्याण शहर शाखेतर्फे उचलण्यात येणार असल्याची ग्वाही शहरप्रमुख रवी पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी विजय देशेकर, अंकुश जोगदंड, बबलेश पाटील, सुजित रोकडे, सूरज खानविलकर, चेतन म्हामुणकर, चेतन कबरे तसेच मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह